२०१८ मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणारी कोल्हापूरची राही सरनोबत हिला गेल्या दीड वर्षांपासून सरकारी नोकरीत असूनही पगार मिळालेला नसल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. राही सरनोबत हिला २०१४ मध्ये सरकारी नोकरी देण्यात आली होती. तेव्हापासून राज्य सरकारच्या महसूल विभागात ती कार्यरत आहे. मात्र सप्टेंबर २०१७ पासून राहीला पगार मिळलेला नसल्याचे राहीने सांगितले आहे.

राही हिने आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये नेमबाजी प्रकारात सुवर्णपदक पटकावले. या प्रकारात भारताला सुवर्णपदक मिळवून देणारी राही ही पहिली महिला खेळाडू ठरली होती. २०२० साली होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धांमध्येही तिने सहभाग घेतला असून त्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी तिला बिनपगारी रजा घ्यावी लागली आहे.

या सर्व बाबींबद्दल राहीने ‘टाईम्स’ला दिलेल्या माहितीनुसार तिला सप्टेंबर २०१७ पासून पगार मिळालेला नाही. ऑलिम्पिक स्पर्धांसाठीदेखील राहीने राज्य महसूल विभागाकडून बिनपगारी रजा घेतली आहे. याबाबत मुंबईला जाऊन संबंधितांशी चर्चा करण्याची माझी इच्छा होती. मात्र पूर्णवेळ खेळाडू असल्याने मला तितका वेळ उपलब्ध होऊ शकलेला नाही.

याशिवाय, एका वहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत राहीने सरकारकडे एक मागणी केली आहे. सरकारी नोकरीवर खेळाडूंनी कधीपासून रुजू व्हावे हे ठरवण्याचे खेळाडूंना स्वातंत्र्य देण्यात यावे, असे ती म्हणाली आहे. तसेच महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा झाली असून थकलेला पगार दोन तीन महिन्यात मिळेल, अशी अपेक्षाही तिने व्यक्त केली आहे.