तुषार वैती

स्वातंत्र्यानंतर ओडिशा हे राज्य नेहमीच वाईट कारणांसाठी ओळखले जात होते. गरिबी, कुपोषण, उपासमारीमुळे होणारे मृत्यू, लहान मुलांची तस्करी तसेच सतत झेलावी लागणारी वादळे आणि त्यामुळे उद्ध्वस्त होणारे जनजीवन यामुळे ओडिशाला कधीही उभारी घेता आली नाही. मात्र गेल्या दीड-दोन दशकांपासून ओडिशामधील परिस्थिती सुधारत चालली आहे. गरिबीच्या समस्येवरही ओडिशाने मात करण्यास सुरुवात केली आहे. आता ओडिशा हे राज्य जगाच्या नकाशावर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. भारताच्या पुरुष आणि हॉकी संघाला पुरस्कर्ते म्हणून आधार देणाऱ्या ओडिशा सरकारने पुरुषांच्या हॉकी विश्वचषक स्पर्धेचे शिवधनुष्य उचलले आहे. देशातील कोणत्याही राज्य सरकारने अशा प्रकारच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे आयोजन करण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी. भुवनेश्वर येथे २८ नोव्हेंबरपासून जगातील अव्वल १६ संघ जगज्जेतेपदाचा चषक उंचावण्यासाठी झुंजणार आहेत.

मैदानी हॉकीसाठी ऑलिम्पिकनंतर सर्वात मोठी स्पर्धा म्हणजे हॉकी विश्वचषक. दर चार वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेत यंदापासून १२ ऐवजी १६ संघ सहभागी होणार आहेत. १९८२ मध्ये मुंबईत, २०१० मध्ये नवी दिल्ली येथे आणि आता भुवनेश्वर येथे भारतात तिसऱ्यांदा ही स्पर्धा होत आहे. या स्पर्धेसाठी नूतनीकरण करण्यात आलेले अद्ययावत सोयीसुविधांनी युक्त असे कलिंगा स्टेडियम सज्ज झाले आहे. स्टेडियमची प्रेक्षकक्षमताही ९ हजारांवरून १५ हजार इतकी करण्यात आली आहे.

या स्पर्धेच्या इतिहासावर नजर टाकली तर चार वेळा जेतेपदे पटकावणारा पाकिस्तान हा सर्वात यशस्वी संघ आहे. त्याउलट भारताला फक्त एकदाच १९७५ मध्ये जेतेपद पटकावता आले आहे. मात्र या स्पर्धेसाठी तब्बल १४ वेळा पात्र होण्याचा मान भारताने पटकावला आहे. ८०च्या दशकानंतर भारताची हॉकीवरील मक्तेदारी हळूहळू संपुष्टात येत गेली. पण गेल्या काही वर्षांत भारतीय हॉकीने पुन्हा कात टाकण्यास सुरुवात केली. रिक चार्ल्सवर्थ, होजे ब्रासा, रोएलन्ट ओल्टमन्स यांसारख्या परदेशी प्रशिक्षकांकडून भारताने त्यांच्या शैलीनुसार आक्रमक तसेच बचावाचे तंत्र आत्मसात केले. आता हरेंद्र सिंग या भारताच्या युवा आणि अनुभवी प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली भारतीय हॉकी संघ पुन्हा एकदा घरच्या चाहत्यांसमोर मैदान गाजविण्यासाठी सज्ज झाला आहे.

मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ गेल्या काही महिन्यांपासून हॉकी विश्वचषकासाठी कसून तयारी करत आहे. अनुभवी सरदार सिंगला या स्पर्धेतून वगळत निवड समितीने सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला खरा. पण गेल्या दोन वर्षांपासून सरदार चांगल्या फॉर्मात नव्हता. सरदारपेक्षा मनप्रीतचा खेळ अधिक आकर्षक असला तरी त्यात सातत्य राखण्याची गरज आहे. हॉकीमध्ये गोलरक्षकाची भूमिका सर्वात महत्त्वाची ठरते. पी. आर. श्रीजेश या अनुभवी, कसलेल्या आणि भारताला अनेक सामने जिंकून देणाऱ्या गोलरक्षकाकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे. सध्याचा भारतीय संघ हा जगज्जेता होण्यासाठी ७० टक्के योग्य आहे, असे काहींचे मत असले तरी मनप्रीत, श्रीजेश, रुपिंदरपाल सिंग, हरमनप्रीत सिंग, मनदीप सिंग, एस. व्ही. सुनील, वीरेंद्र लाक्रा, अमित रोहिदास यांच्यासह अनेक युवा खेळाडू संघात आहेत.

भारतीय हॉकी ही काहीशी बचावात्मक पद्धतीची, पण त्यात आता आक्रमकपणा आला आहे. खेळाडूंचा वेग, चपळता वाढली आहे. मानसिकतेत बदल झाला आहे. प्रशिक्षकांचा खेळाडूंशी असलेला संवाद वाढला आहे. त्याचबरोबर खेळाडूंची तंदुरुस्ती एका वेगळ्या उंचीवर पोहोचल्यामुळे त्याचे सकारात्मक परिणाम भारतीय हॉकीवर दिसून येत आहेत. चेंडू वळवण्याची कला (ड्रिब्लिंग) हे भारताचे बलस्थान होते. पूर्वीच्या काळी भारताच्या याच कौशल्याची धडकी परदेशी संघांमध्ये असायची. आता जगातील सर्वच संघांनी हे कौशल्य आत्मसात केल्यामुळे वेगळीच चुरस पाहायला मिळत आहे. पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करण्यात भारतीय संघ काहीसा कमी पडत आहे. त्याचबरोबर मधल्या फळीतील असातत्यपूर्ण कामगिरीचा फटका भारताला बसत आहे. महत्त्वाच्या सामन्यात दडपणाखाली सरस खेळ करण्यात भारतीय संघ काहीसा कमी पडत आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात हीच चूक भारताला महागात पडली, अन्यथा २०२०च्या टोकियो ऑलिम्पिकमधील भारताचे स्थान निश्चित झाले असते. या सर्व गोष्टींवर भारताला मेहनत घ्यावी लागणार आहे.

tushar.vaity@expressindia.com