आयपीएलच्या बाद फेरीमध्ये स्थान मिळविण्यासाठी हैदराबाद सनरायजर्सला रविवारी शेवटच्या साखळी सामन्यात सुवर्णसंधी चालून आली आहे. मात्र त्यासाठी त्यांना गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्सवर विजय मिळविणे अनिवार्य आहे.
साखळी गटात हैदराबादचे १८ गुण आहेत. त्यामुळे आणखी एक सामना जिंकल्यास त्यांचा बाद फेरीतील प्रवेश निश्चित होईल. मात्र त्याकरिता त्यांना गोलंदाजीप्रमाणेच फलंदाजीतही भरीव कामगिरी करण्याची आवश्यकता आहे. आजपर्यंत त्यांना विजय मिळवून देण्यात डेल स्टेन, इशांत शर्मा, अमित मिश्रा, डॅरेन सॅमी यांनी महत्त्वाचा वाटा उचलला आहे. फलंदाजीत कुमार संगकारा, कॅमेरून व्हाइट, पार्थिव पटेल, शिखर धवन, थिसारा परेरा, डॅरेन सॅमी यांना अव्वल दर्जाची कामगिरी करणे आवश्यक आहे.
कोलकाता संघाची यंदाची कामगिरी पाहिल्यास या संघाने गतवर्षी विजेतेपद मिळविले असेल असे कोणास सांगून पटणार नाही. फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही आघाडय़ांवर सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात त्यांचे खेळाडू अपयशी ठरले आहेत. फलंदाजीत कर्णधार गौतम गंभीर, युसुफ पठाण, जॅक कॅलिस, मनविंदर बिस्ला, रजत भाटिया, इओन मॉर्गन, रयान टेन डोइश्चॅट आदी अनुभवी खेळाडूंकडून चमकदार यशाची त्यांना अपेक्षा आहे.
गोलंदाजीत सुनील नरेन, कॅलिस, भाटिया, पठाण, ब्रेट ली, सुचित्रा सेनानायके, लक्ष्मीपती बालाजी आदी खेळाडूंवर त्यांची भिस्त आहे.    
सामना : कोलकाता नाइट रायडर्स वि. सनरायजर्स हैदराबाद.
स्थळ : राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, उप्पल.वेळ : रात्री ८ वाजल्यापासून.