नावाच्या सारखेपणामुळे अनेकदा गोंधळ उडताना आपण ऐकतो. अनेकदा या प्रकारामुळे गोंधळी उडतो. नुकत्याच झालेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेत दोन शहरांच्या नावातील सारखेपणामुळे काही स्विस पर्यटक तब्बल १२०० किलोमीटर दूर पोहोचले होते. त्यामुळे त्या पर्यटकांना सामन्याला मुकावे लागले होते. पण आता गोल्फ स्पर्धांचे आयोजन करणाऱ्या द युरोपियन टूर स्पर्धांमध्ये एक भली मोठी चूक झाल्याचे दिसून आले. नावाच्या सारखेपणामुळे एका स्पर्धकाला देण्यात येणारे सुमारे १ कोटींचे बक्षीस हे चक्क दुसऱ्याच माणसाच्या खात्यात जमा करण्यात आले.

थॉमस फ्लीटवूड या ब्रिटिश खेळाडूला देण्यात येणार असलेले सुमारे १ कोटींचे बक्षीस सारखेच नाव असलेल्या एका अमेरिकेच्या गोल्फ प्रशिक्षकाच्या खात्यात जमा करण्यात आले. युरपियन टूर आयोजकांकडे अमेरिकेच्या प्रशिक्षकाच्या बँक खात्याचे विवरण होते. काही दशकांपूर्वी या प्रशिक्षकाने ही स्पर्धा खेळली असल्याने त्याच्या खात्याचा तपशील आयोजकांकडे होता. त्यामुळे इनामाची रक्कम ही त्या प्रशिक्षकाच्या खात्यात जमा करण्यात आली.

ही घटना समजल्यानंतर आयोजकांवर प्रचंड टीका झाली. अखेर आपली चूक मान्य करत आयोजकांनी चूक दुरुस्त केली.