मिलिंद ढमढेरे – response.lokprabha@expressindia.com
ऑलिम्पिक रौप्यपदक विजेते राजवर्धनसिंह राठोड यांच्याकडे केंद्रीय क्रीडा मंत्रिपद आल्यानंतर त्यांनी क्रीडा क्षेत्रात अनेक आमूलाग्र बदल केले होते. त्याचे फळ यंदाच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अनुभवायला मिळाले आहे.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या देशांचा एकूण दर्जा लक्षात घेता भारतीय खेळाडूंसाठी ही लुटुपुटूची लढाईच असते असे सर्वसाधारणपणे म्हटले जाते. तरीही इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडासारख्या तुल्यबळ देशांच्या सहभागामुळे भारतीय खेळाडूंची या स्पर्धेत कसोटी लागत असते. ही पाश्र्वभूमी लक्षात घेतल्यास यंदा भारतीय खेळाडूंनी खूपच आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. टेबल टेनिस, बॉक्सिंग, बॅडमिंटन, कुस्ती आदी खेळांमधील अनपेक्षित यश लक्षात घेतल्यास भारताच्या क्रीडा क्षेत्रात ‘अच्छे दिन’ येऊ लागले आहेत.

सुपरमॉम एम.सी.मेरी कोम, तंदुरुस्तीबाबत साशंक असलेली सायना नेहवाल, अनुभवी नेमबाज तेजस्विनी सावंत या बुजुर्ग खेळाडूंबरोबरच मनिका बात्रा, मनू भाकर, अनीष भानवाला या युवा खेळाडूंनी मिळविलेले यश भारताच्या आगामी आशियाई व ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धासाठी प्रेरणादायक आहे. वेटलिफ्टिंग, स्क्व्ॉश, कुस्ती आदी खेळांमधील भरघोस पदके ही देखील भारतीय खेळाडूंची कामगिरी उंचावणारी होत आहे याचेच प्रतीक आहे. मात्र हॉकीमध्ये भारताच्या पुरुष व महिला या दोन्ही संघांना पदक मिळविण्यात आलेले अपयश ही निश्चितच आत्मचिंतन करणारी गोष्ट आहे. तसेच अ‍ॅथलेटिक्ससारख्या पदकांचा खजिना लुटण्याची संधी असलेल्या क्रीडा प्रकारातील मर्यादित यश हीदेखील विचार करावयास लावणारी गोष्ट आहे. इंजेक्शन्स बाळगण्यावरून झालेला गोंधळ म्हणजे जीवावर बेतले व बोटावर निभावले यासारखीच स्थिती आहे. भारतीय संघटकांनी असे प्रसंग टाळले पाहिजेत.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंना पदकांची लयलूट करण्याची हुकमी संधी असते असे नेहमीच म्हटले जाते. जागतिक स्तरावर भारतासाठी आव्हानात्मक असलेले अमेरिका, चीन, जपान, दक्षिण कोरिया व अन्य काही युरोपियन देशांचा त्यामध्ये समावेश नसतो. त्यामुळे भारतीय खेळाडूंना आगामी आशियाई व ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी आपले कौशल्य व क्षमता चाचपण्याची ही रंगीत तालीम असते. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेते राजवर्धनसिंह राठोड यांच्याकडे केंद्रीय क्रीडा मंत्रिपद आल्यानंतर त्यांनी क्रीडा क्षेत्रात अनेक आमूलाग्र बदल केले होते. ऑलिम्पिक पदक व्यासपीठ योजनेंतर्गत खेळाडूंना जे आर्थिक साहाय्य दिले जाते, ते थेट खेळाडूंच्या बचत खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे खेळाडू किंवा त्यांचे पालकांचे सरकारी कार्यालयात होणारे हेलपाटे वाचले तसेच कोणतीही दक्षिणा न देता ही रक्कम वेळच्या वेळी मिळू लागल्यामुळे खेळाडूही सुखावले. ऑलिम्पिक पदकांची क्षमता असणाऱ्या खेळाडूंना परदेशात स्पर्धात्मक सरावासाठी व प्रशिक्षण शिबिरांसाठी प्रवासखर्च कोणतीही आडकाठी न येता मिळू लागला.

खेळाडूंनी केवळ सरावावर लक्ष केंद्रित करावे व बाकी सारे शासनावर सोपवावे असा सल्ला शासनाने दिला. त्याचा सर्वात मोठा फायदा टेबल टेनिसपटूंना मिळाला. गेले दीड-दोन वर्षे फक्त स्पर्धा किंवा प्रशिक्षण शिबिर हेच खेळाडूंचे जीवन झाले होते. संघास संदीप गुप्ता यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे इटालियन प्रशिक्षक मासिमो कॉन्स्टन्टिनी हे २०१० पासून भारतीय खेळाडूंशी निगडित असल्यामुळे खेळाडूंची इत्थंभूत माहिती त्यांना असते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय महिलांनी इतिहास घडविला. त्यांनी प्रथमच राष्ट्रकुल स्पर्धेतील सांघिक विभागात विजेतेपद पटकाविले. त्यांच्या या कामगिरीत महत्त्वाचा वाटा असलेल्या मनिका बात्रा हिने वैयक्तिक एकेरीत सुवर्णपदक मिळवित आपल्या कामगिरीवर शिरपेच चढविला. तिने विजेतेपद मिळविताना सिंगापूरच्या तीन खेळांडूंवर मात केली ही कामगिरीच खूप बोलकी आहे. तिच्याप्रमाणेच मधुरिका पाटकर, मौमा दास, पूजा सहस्रबुद्धे यांनीही शानदार कामगिरी केली. पुरुष गटांतही सांघिक विभागात अजिंक्यपद मिळवित भारताने दुहेरी धमाका केला. अचंता शरथ, जी.साथियन यांची कामगिरी अभिमानास्पद आहे.

बॉक्सिंगमध्ये पुरुष गटात भारताचे आठ खेळाडू उतरले होते. विकास कृष्णन व गौरव सोलंकी यांच्या सुवर्णपदकाबरोबरच भारताने तीन रौप्य व तीन कांस्यपदके मिळवीत शंभर टक्के यश मिळविले. त्यांच्या या नेत्रदीपक कामगिरीमध्ये स्वीडनचे प्रशिक्षक सँन्टिगो निवा व प्रथमच या स्पर्धेसाठी प्रशिक्षक म्हणून काम करणारे जयसिंग पाटील यांचा मोठा वाटा आहे. तसेच अन्य सपोर्ट स्टाफचाही वाटा आहे. परदेशातील स्पर्धामध्ये भरपूर सहभाग व गेले दोन वर्षे सातत्यपूर्ण सराव हेच भारताच्या यशाचे गमक ठरले. मेरी कोम हिचे यश अन्य युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायक आहे. तीन मुलांची आई व ३५ वय असलेल्या या खेळाडूने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदकाचे स्वप्न साकार केले. भारतीय क्रीडा क्षेत्राची खऱ्या अर्थाने ती सदिच्छादूत आहे.

नेमबाजी हा गेली काही वर्षे अनेक स्पर्धामध्ये भारतासाठी तारणहार ठरलेला क्रीडा प्रकार आहे. अनेक नवोदित चेहरे या खेळात चमक दाखवू लागले आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेतही मनू भाकेर, मेहुली घोष व अनीष भानवाला, अंजुम मुदगिल या नवोदित खेळाडूंनी दिमाखदार कामगिरी केली. त्यांच्याबरोबरच संजीव रजपूत, तेजस्विनी सावंत, हिना सिधू, श्रेयसीसिंग आदी खेळाडूंनी आपल्या नावलौकिकास साजेशी कामगिरी केली. वयाची पस्तिशी पार केली तरी ते वय सुवर्णपदकासाठी अडथळा होत नाही हे तेजस्विनी हिने सिद्ध केले. पुढच्या राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजी हा क्रीडा प्रकार नसणार आहे. त्यामुळे पदकांबाबत होणारा खड्डा कसा भरून काढायचा हा प्रश्न भारतीय संघटकांना निश्चितच जाणविणार आहे.

भारतीय वेटलिफ्टिंग व उत्तेजक हे समीकरण अनेक वेळा डोके वर काढत असते. त्यामुळेच यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंची गेल्या दीड वर्षांत पाचशेहून जास्त वेळा उत्तेजक चाचणी करण्यात आली. त्याचा फायदा भारतास राष्ट्रकुल स्पर्धेत झाला. या खेळात भारतने मिळवलेल्या नऊ पदकांमध्ये पूनम यादव, संजीता चानू, मीराबाई चानू, वेंकट राहुल यांनी मिळविलेल्या सुवर्णपदकांचा मोठा वाटा होता.

बॅडमिंटनमध्येही भारताने सांघिक विभागातील पुरुष व महिला या दोन्ही गटांमध्ये विजेतेपद मिळविले. सायना नेहवाल हिच्याकडे पूर्वीसारखी तंदुरुस्ती राहिलेली नाही अशी अलीकडे टीका केली जात असते. मात्र राष्ट्रकुल स्पर्धेत तिने ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी.व्ही.सिंधूवर शानदार विजय मिळवीत सुवर्णपदक जिंकले. सिंधूने सांघिक लढतींमध्ये भाग घेतला नव्हता. तिच्या अनुपस्थितीत सायना हिनेच एकेरीच्या लढतींची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. किदम्बी श्रीकांत याच्याकडून अजिंक्यपदाची अपेक्षा होती. मात्र ली चोंग वेई या बुजुर्ग खेळाडूपुढे त्याचा अनुभव कमी पडला. खरं तर त्याने पहिली गेम घेतली होती. त्याचा फायदा तो घेऊ शकला नाही. सात्विक रान्किरेड्डी व चिराग शेट्टी यांनी स्पर्धेच्या पदार्पणातच रुपेरी यश मिळवीत कौतुकास्पद कामगिरी केली.

कुस्तीमध्ये सुशीलकुमार याने लागोपाठ तिसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकून सोनेरी हॅट्ट्रिक पूर्ण केली. राहुल आवारे या महाराष्ट्राच्या मल्लानेही पदार्पणातच सोनेरी मोहोर मिळवित भावी यशाची चुणूक दाखविली आहे. बजरंग पुनिया, सुमीत मलिक, विनेश फोगाट यांच्या सुवर्णपदकांसह भारतीय मल्लांनी एक डझन पदके मिळविली.

अ‍ॅथलेटिक्स हा पदकांची लयलूट करण्याचा क्रीडा प्रकार मानला जातो. मात्र नीरज चोप्रा याने भालाफेकीत मिळविलेले सुवर्णपदक, थाळीफेकीत सीमा पुनिया व नवजीत धिल्लन यांनी अनुक्रमे मिळविलेले रौप्य व कांस्यपदक याचा अपवाद वगळता या खेळात भारताला मोठय़ा अपयशास सामोरे जावे लागले. महिलांच्या ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीत भारताचा अनेक वर्षे दबदबा होता. यंदा पहिल्या पाच क्रमांकांमध्येही त्यांना स्थान घेता आले नाही. पुरुष गटात भारतीय खेळाडूंना शर्यतच पूर्ण करता आली नाही. जलतरण, जिम्नॅस्टिक्स आदी खेळांमध्ये आपली पाटी कोरीच राहिली. हॉकीमध्ये भारतास पुरुष व महिला या दोन्ही विभागात कांस्यपदक मिळविता आले नाही. पेनल्टी कॉर्नरद्वारा गोल करण्यासाठी आवश्यक असणारा कमकुवतपणा तसेच सातत्यपूर्ण खेळाचा अभाव यामुळे भारतीय संघांनी सपशेल निराशा केली. यंदा पुरुषांची विश्वचषक स्पर्धा भारतातच होणार आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतील अपयशाचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धा यंदा ऑगस्टमध्ये होणार आहे. २०२० च्या ऑलिम्पिकसाठी ती रंगीत तालीम मानली जाते. राष्ट्रकुल स्पर्धेतील कामगिरीचे बारकाईने अवलोकन करून आगामी स्पर्धामध्ये अव्वल यश मिळविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे तरच आगामी ऑलिम्पिकमध्येही अच्छे दिन पाहावयास मिळतील.
सौजन्य – लोकप्रभा