फेडरेशन चषक टेनिस स्पर्धा

पीटीआय, अस्ताना (कझाकस्तान)

बंदिस्त कोर्टवरील खेळात चांगली सव्‍‌र्हिस निर्णायक ठरू शकते. अंकिता रैना आणि कारमान कौर थंडी यांना कझाकस्तानच्या खेळाडूंविरुद्ध खेळताना हे समीकरण लक्षात ठेवून खेळ करावा लागेल, असे फेडरेशनच चषकातील भारताच्या प्रशिक्षका अंकिता भांबरी यांनी सांगितले.

आशिया-ओशियाना गटात भारताच्या अभियानाला गुरुवारी थायलंडविरुद्धच्या सामन्याने प्रारंभ होणार आहे. त्यानंतर शुक्रवारी भारताचा सामना कझाकस्तानशी होणार आहे. थायलंडचा अडथळा पार करणे भारतासाठी फारसे अवघड नाही. थायलंडची सर्वोत्तम खेळाडू पेंगटारन प्लिपुएच ही जागतिक क्रमवारी २९७ व्या स्थानी तर पुनिन कोपितुक्तेड ही तब्बल ६५७ व्या स्थानावर आहे. त्यामुळे भारताला या दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवणे सहज शक्य असल्याचे कयास आहेत. मात्र, त्यानंतर कझाकस्तानच्या अव्वल खेळाडूंचा मुकाबला करणे भारतासाठी खरे आव्हान ठरणार आहे. भारतीय टेनिसपटूंच्या खेळ पाहता त्यांना चांगली संधी असल्याचे मत भांबरी यांनी व्यक्त केले. ‘‘ बंदिस्त कोर्टवरील सामन्यात तुम्ही चांगली सव्‍‌र्हिस केलीत तर तो गुण तुम्हाला मिळण्याची शक्यता अधिक असते. जागतिक क्रमवारीत पहिल्या १०० मध्ये असणाऱ्या खेळाडूंविरुद्ध खेळणे नेहमीच अवघड आव्हान असते. अंकिताने यापूर्वी कझाकस्तानच्या युलियाविरुद्ध खेळून सामना जिंकल्याचा अनुभव तिच्यासाठी मोलाचा ठरू शकतो,’’ असे भांबरी यांनी नमूद केले. कझाकस्तानच्या सामन्याबाबत बोलताना अंकिताने सकारात्मकपणे खेळणार असल्याचे नमूद केले.‘‘ मी देशासाठी खेळताना नेहमीच माझा सर्वोत्तम खेळ खेळले आहे. मी कधीही खेळाडूंचे मानांकन पाहून खेळ करीत नाही,’’ असे अंकिताने सांगितले.