राष्ट्रीय प्रशिक्षक गोपीचंद यांच्याकडून खेळाडूंवर स्तुतिसुमनांचा वर्षांव

भारतीय बॅडमिंटनसाठी २०१७ वर्ष फलदायी ठरले. सर्वच प्रमुख खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. त्यांनी संपूर्ण क्षमतेने खेळ केल्याने मी आनंदी आहे, असे भारताचे राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी म्हटले. पुलेला गोपीचंद अकादमीतर्फे १० वर्षांखालील मुलांसाठी शोधमोहीम राबवली जाणार आहे. त्याची घोषणा बुधवारी मुंबईमध्ये करण्यात आली.

भारतीय बॅडमिंटनची यंदाची कामगिरी आणि आगामी दुबई जागतिक सुपरसीरिज फायनल्स स्पर्धेबाबत विचारले असता, ‘‘गतवर्ष सिंधूने गाजवले. यंदा पुरुष एकेरीमध्ये चांगले यश मिळाले. श्रीकांतने सवरेत्कृष्ट खेळ केला. त्याच्यासह बी. साई प्रणीथ, एच. एस. प्रणॉय, समीर वर्मा यांनीही खेळ उंचावला. सर्वाच्या कामगिरीबाबत मी समाधानी आहे. दुबईमध्ये होणाऱ्या जागतिक सुपरसीरिज फायनल्स स्पर्धेत चमकदार खेळ करण्यासह हंगामाचा शेवट गोड करण्यास उत्सुक आहोत. पुढील वर्षांत सवरेत्कृष्ट कामगिरीसाठी या स्पर्धेतील कामगिरी महत्त्वपूर्ण ठरेल.’’

प्रशिक्षक गोपीचंद यांनी श्रीकांतचे तोंडभरून कौतुक केले. ‘‘चार सुपरसीरिज स्पर्धा जिंकताना एका स्पर्धेत उपविजेतेपद तसेच वर्षअखेर जागतिक क्रमवारीमध्ये झालेली कमालीची सुधारणा पाहता तो कौतुकास पात्र आहे. श्रीकांत आता २४ वर्षांचा आहे. अनेक आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू ३५व्या वर्षांपर्यंत खेळतात. त्यामुळे किमान ८ ते १० वर्षे तो खेळू शकतो. संपूर्ण क्षमतेने केलेला खेळ आणि अव्वल जागतिक खेळाडूंवरील विजय पाहता श्रीकांतकडून खूप अपेक्षा असतील,’’ असे गोपीचंद म्हणाले.

पी. व्ही. सिंधूचेही गोपीचंद यांनी कौतुक केले. ‘‘सिंधूनेही या वर्षी चांगली कामगिरी करताना चीन, कोरिया आणि इंडिया खुली स्पर्धेत बाजी मारली आहे. ऑलिम्पिक रौप्यपदकानंतरही तिच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. त्याप्रमाणे ती खेळत आहे. तिचे एकेरी क्रमवारीतील स्थानही चांगले आहे. स्पेनची कॅरोलिन मॅरिन, जपानची नोझोमी ओकुहारा, चीन तैपेइची टाइ झु यिंग यांच्याविरुद्ध खेळताना तिला अडचणी येत आहेत. मात्र तिच्यामध्ये सवरेत्कृष्ट कामगिरीची क्षमता आहे.

सायना नेहवालबद्दल विचारले असता ते म्हणाले. ‘‘तिने तिच्या खेळातील काही गोष्टींवर थोडी मेहनत घेण्याची आवश्यकता आहे. मलेशिया खुल्या स्पर्धेत तिने चषक उंचावला. सायना दुखापतीतून सावरत असल्याचे जाणवते. जागतिक स्पर्धा जिंकण्यास सक्षम असल्याचे तिने दाखवून दिले आहे.’’

पुढील वर्षी विविध खुल्या स्पर्धासह राष्ट्रकुल आणि आशियाई अशा दोन महत्त्वपूर्ण स्पर्धा आहेत. ‘‘दर दोन वर्षांनी प्रमुख जागतिक स्पर्धा असतात. पुढील वर्षी राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धा होत आहे. त्यामुळे ते वर्ष आव्हानांचे आहे. २०१४ वर्ष आमच्यासाठी चांगले होते. त्यापेक्षा सवरेत्कृष्ट कामगिरीसाठी प्रयत्न करू.’’ असा विश्वास गोपीचंद यांनी व्यक्त केला आहे.

माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोन यांनी अधिकाधिक प्रशिक्षक तयार करण्याची मागणी केली आहे. त्यावर मत व्यक्त करताना ‘‘माजी बॅडमिंटनपटूंना चांगले प्रशिक्षण देऊन ते चांगले प्रशिक्षक तयार होतील, असे नाही. खेळाडूंनी आदर करावा, असे प्रशिक्षक हवेत. शैक्षणिक क्षेत्रात शिक्षकांसमोर जे आव्हान असते तेच विविध क्रीडा प्रशिक्षकांसमोर असते. त्यामुळे चांगले प्रशिक्षण घेतलेले तसेच खेळाडूंमध्ये जिंकण्याची प्रेरणा निर्माण करणारे प्रशिक्षक हवेत,’’ असे गोपीचंद म्हणाले.