२ सप्टेंबर, २०१४- भारताची फुलराणी सायना नेहवालने गोपीचंद यांच्याऐवजी विमल कुमार यांच्याकडे प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. सायनाची कारकीर्द घडवण्यात गोपीचंद यांची भूमिका निर्णायक आहे.
२६ सप्टेंबर, २०१४- प्राजक्ता सावंतने दाखल केलेल्या खटल्यादरम्यान न्यायालयाने गोपीचंद यांच्या k07भूमिकेसंदर्भात प्रश्न उपस्थित केला. वैयक्तिक अकादमी चालवणारी व्यक्ती मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक म्हणून नि:पक्षपातीपणे काम करू शकते का, असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला.
२ एप्रिल, २०१५- रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवू शकतील अशा खेळाडूंसाठी तयार करण्यात आलेल्या योजनेत दुहेरी विशेषज्ञ ज्वाला गट्टाला वगळण्यात आले. क्रीडा मंत्रालयाच्या भूमिकेवर टीकास्त्र सोडताना ज्वालाने मुख्य प्रशिक्षक गोपीचंद यांच्यावरही टीकेची झोड उठवली आहे. गोपीचंद खेळाडू असूनही दुहेरीला नेहमीच सापत्न वागणूक दिली जाते. निधी, संधी या सगळ्यात अवहेलना होते असा ज्वालाचा आरोप आहे.
भारतात बॅडमिंटनची संस्कृती रुजवण्याचं श्रेय गोपीचंद यांना जातं. खेळाडू म्हणून कारकीर्द घडवल्यानंतर गोपीचंद यांना प्रशिक्षणाचे महत्त्व जाणवले. निधी, जागा, अन्य सोयीसुविधा नसताना आणि देशात फक्त क्रिकेटचे वारे असताना गोपीचंद यांनी अकादमीची स्थापना केली. यासाठी आर्थिक खस्ताही सहन केल्या. अकादमी प्रत्यक्षात साकारल्यानंतर केवळ प्रशासक म्हणून न राहता गोपीचंद यांनी अकादमीप्रति स्वत:ला झोकून दिलं. खेळाडूंना एकाच छताखाली सर्व सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी अकादमीत बॅडमिंटन कोर्टप्रमाणेच व्यायामशाळा, जलतरण तलाव, आहारतज्ज्ञ मिळावे यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. भारतात ज्याचं वावडं आहे ते म्हणजे शिस्त आणि यंत्रणा यावर गोपीचंद यांनी भर दिला. प्रत्येक खेळाडूवर वैयक्तिक लक्ष, त्याच्या खेळातल्या बारकाव्यांचा अभ्यास, दुखापत व्यवस्थापन यासाठी गोपीचंद ओळखले जातात. आजही पहाटे साडेचार ते संध्याकाळी साडेसात इतका वेळ गोपीचंद अकादमीसाठी देतात. गोपीचंद यांचा दिनक्रम बॅडमिंटनमय असतो. अकादमी, आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये खेळाडूंना मार्गदर्शन यासाठी सातत्याने प्रवास यामुळे गोपीचंद आपल्या कुटुंबीयांना वेळही देऊ शकत नाहीत. त्यांच्या त्यागामुळेच भारतीय बॅडमिंटनपटू आंतरराष्ट्रीय स्तरावर नावारूपाला आले आहेत. सायनाच्या बरोबरीने पी.व्ही. सिंधू, पारुपल्ली कश्यप, किदम्बी श्रीकांत, आरएमव्ही गुरुसाईदत्त, समीर वर्मा आणि सौरभ वर्मा अशा दमदार खेळाडूंची फौज गोपीचंद यांनीच तयार केली आहे. कारकिर्दीतील चढउतारात वडिलकीच्या नात्याने खंबीरपणे मागे उभे राहणारे गोपीचंद या युवा खेळाडूंसाठी गोपीभैयाच आहेत. आंतरराष्ट्रीय क्रमवारी असो किंवा राष्ट्रीय स्पर्धेतील जेतेपदांचे मानकरी सगळीकडे गोपीचंद यांनी घडवलेल्या शिष्यांची मक्तेदारी असते. गोपीचंद यांच्या प्रयत्नांमुळेच हैदराबाद बॅडमिंटनचं सत्ताकेंद्र झालं आहे. खेळाशी संदर्भात सगळी सूत्रं एका व्यक्तीच्या हाती एकवटणं योग्य नाही याचा प्रत्यय आता येऊ लागला आहे.
मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक, निवड समिती सदस्य, इंडियन बॅडमिंटन लीग गव्हर्निग काऊन्सिल सदस्य, भारतीय ऑलिम्पिक संघटना सल्लागार समिती सदस्य, रिओ ऑलिम्पिक लक्ष्य योजना सदस्य अशा सगळ्या ठिकाणी गोपीचंद आहेत. त्यांची नियुक्ती कर्तृत्वानुसार झाली असली, तरी एकच माणूस या सगळ्या भूमिकांना तटस्थपणे न्याय देऊ शकणार का, हा प्रश्न उरतोच. गोपीचंद यांच्यापल्याडही बॅडमिंटन आहे याची जाणीव तीव्र होऊ लागली आहे. गोपीचंद यांचं बॅडमिंटनला योगदान वादातीत आहे, मात्र देशातल्या दोन अव्वल बॅडमिंटनपटूंनी गोपीचंद यांच्याशी फारकत घेतली आहे, तर मुंबईकर प्राजक्ता सावंतने तर गोपीचंद यांच्याविरोधात न्यायालयीन लढाईचा मार्ग स्वीकारला. सायनाच्या यशानंतर देशभरात बॅडमिंटन चळवळ जोर धरू लागली. अनेक माजी खेळाडू प्रशिक्षणाचं काम करत आहेत. गोपीचंद अकादमीसारखं मूर्त स्वरूप त्यांच्या मार्गदर्शनाला नसेलही परंतु पायाभूत स्तरावर त्यांचं काम सुरू आहे. एक व्यक्ती, एक अकादमी आणि एकछत्री अंमल असं होऊ देण्यापेक्षा भारतीय बॅडमिंटन संघटनेतर्फे देशांतर्गत अव्वल प्रशिक्षकांची साखळी निर्माण होऊ शकते. संघटनेने कॉर्पोरेट्सच्या मदतीने निधी उभा केल्यास अकादमी उभारली जाऊ शकते. सायनाचे नवीन प्रशिक्षक विमल कुमार यांच्या निमित्ताने प्रकाश पदुकोण अकादमीचं काम अधोरेखित झालं आहे. गोपीचंद अकादमीच्या दबदब्यापुढे ही अकादमी झाकोळली गेली आहे. यानिमित्ताने पदुकोण अकादमीला मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे. भारतात अव्वल दर्जाचा बॅडमिंटनपटू व्हायचं असेल तर तो फक्त गोपीचंद किंवा त्यांच्या अकादमीच्या माध्यमातूनच व्हावा ही मक्तेदारी संपुष्टात यायला हवी. खेळाडू घडवण्याची कार्यपद्धती, शिस्त याचा वस्तुपाठ गोपीचंद यांनी दिला आहे. हा वसा अन्य प्रशिक्षकांमध्ये वळता व्हावा यासाठी गोपीचंद यांच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण करता येऊ शकते. दिलेल्या जबाबदाऱ्या ते उत्तम निभावत असले तरी बाकीच्यांना स्वत:ला सिद्ध करण्याची किमान एक संधी मिळायलाच हवी.
सायनाने प्रशिक्षक म्हणून विमल कुमारांकडे जायचा निर्णय किंवा ज्वाला गट्टाची सातत्यपूर्ण टीका, गोपीचंद यांनी कधीही शाब्दिक प्रत्युत्तर दिलेले नाही. चमकोगिरीपेक्षा कृतीवर भर देणे हा त्यांचा स्थायीभाव. मात्र बोलत नाही म्हणजे त्यांची भूमिका योग्य असे होत नाही. कुठल्याही व्यक्तीची आवडनिवड, पूर्वग्रह त्याच्या कामात परावर्तित होत असते. मात्र सगळीकडे एकच व्यक्ती असेल तर या आवडीनिवडी, पूर्वग्रह यांना पुष्टी मिळण्याची शक्यता जास्त आहे.  
‘परस्परविरोधी हितसंबंध’ ही संज्ञा क्रीडाक्षेत्रात परवलीची झाली आहे. या संज्ञेचे शिकार गोपीचंद ठरतील अशी शक्यता आता निर्माण झाली आहे. फुटबॉल विश्वचषक विजेता जर्मनी किंवा क्रिकेट विश्वचषक विजेता ऑस्ट्रेलिया दोन्हीमधले साम्य म्हणजे वैयक्तिक प्रभुत्वापेक्षा सांघिक प्रयत्न. बॅडमिंटन वैयक्तिक खेळ असला तरी तो चालवणाऱ्या प्रशिक्षक, संघटक, संयोजक सगळीकडे एका व्यक्तीचे वर्चस्व पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यातले अपयश दर्शवते. बॅडमिंटनच्या विकासाकरिता असंख्य गोपीचंद घडवणे हाच उपाय व्यवहार्य आहे.