सरावाला प्रारंभ करण्यापूर्वी क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांचे मत

नवी दिल्ली : भारतातील महत्त्वाच्या राज्यांमध्ये लवकरच खेळाडूंना सरावयोग्य वातावरण निर्माण करून देण्यासाठी क्रीडा खाते प्रयत्नशील आहे; परंतु यासाठी खेळाडूंचा करोनापासून बचाव करणे गरजेचे असून त्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी प्रतिक्रिया के ंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केली.

गेल्या आठवडय़ात रिजिजू यांनी ऑलिम्पिकशी निगडित असणाऱ्या खेळातील क्रीडापटूंसाठी स्टेडियममध्ये सराव सुरू करण्याबाबत विचार मांडला होता. विशेषत: बेंगळूरुतील राष्ट्रीय क्रीडा संस्था (एनआयएस) आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण (साइ) येथे असलेल्या खेळाडूंसाठी ही मोहीम लवकरच सुरू करण्यात येण्याची शक्यता आहे.

‘‘खेळाडूंच्या सरावाला प्रारंभ करण्याविषयीची रूपरेषा आम्ही आखलेली आहे; परंतु यापुढील प्रत्येक स्पर्धेदरम्यान खेळाडूंच्या आरोग्य तसेच सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असेल. त्यामुळेच सर्वप्रथम खेळाडूंना करोनापासून वाचवण्याला आमचे प्राधान्य आहे. त्यांच्या आरोग्याबाबत कोणतीही हयगय केली जाणार नाही,’’ असे रिजिजू म्हणाले.

‘‘वैद्यकीय, तांत्रिक चमूंपासून प्रशिक्षक आणि खेळाडूंनाही याविषयी कल्पना देण्यात आली आहे. दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियम, ‘साइ’ची केंद्रे यांप्रमाणे महत्त्वाच्या राज्यातील अनेक क्रीडा संकुल लवकरच उघडण्यात येतील. मात्र खेळाडूंना यापूर्वी विविध वैद्यकीय चाचण्यांना सामोरे जावे लागेल,’’ असेही ४८ वर्षीय रिजिजू यांनी सांगितले.

‘‘या सराव शिबिरांमध्ये ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंना साहजिकपणे प्राधान्य दिले जाईल. टाळेबंदीचा काळ वाढल्यास या संकल्पनेबाबत पुन्हा विचार करण्यात येईल; परंतु किमान जुलै महिना सुरू होण्यापूर्वी खेळाडूंना मैदानावर परत आणण्यासाठी क्रीडा खात्रे प्रयत्नशील आहे,’’ असे रिजिजू यांनी नमूद केले.

‘साइ’कडून विशेष समितीची स्थापना

नवी दिल्ली : करोनामुळे देशभरात लागू करण्यात आलेली टाळेबंदी संपल्यानंतर खेळाडूंच्या सरावास पुन्हा प्रारंभ करण्यासाठी भारतीय क्रीडा प्राधिकरणातर्फे (साइ) सहा सदस्यांचा समावेश असलेली समिती नेमण्यात आली आहे. ही समिती खेळाडूंसाठी मानक कार्यप्रणाली (एसओपी) आखून त्यांना सामाजिक अंतराविषयी माहिती देईल. ‘साइ’चे सचिव रोहित भारद्वाज हे या समितीचे अध्यक्ष असतील, तर राजेश राजगोपालन, एस. एस. रॉय, बी. के. नायक, सचिन के., एस. एस. सरला यांचाही त्या समितीत समावेश असेल. खेळाडूंच्या सराव शिबिरांबरोबरच त्यांच्या आरोग्यविषयक बाबींकडेही ही समिती लक्ष पुरवेल.