करोना रुग्णसंख्येच्या वाढत्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने शुक्रवार ते सोमवार संपूर्ण लॉकडाऊन आणि इतर दिवशी कडक निर्बंध जाहीर केले आहेत. या निर्बंधानंतर मुंबईतील आयपीएल सामन्यांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने आयपीएल सामने मुंबईतच खेळवणार असल्याचे स्पष्ट केले. आता महाराष्ट्र सरकारनेही आयपीएलला परवानगी दिली आहे.
मुंबई आयपीएलचे 10 सामन्यांचे आयोजन करणार आहे. त्यातील काही सामने शनिवार व रविवारी होणार आहेत. मुंबईतील पहिला सामना 10 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे.
महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी आयपीएलचे सामने योजनेनुसार होतील याची पुष्टी केली आहे. नवाब मलिक एएनआयला म्हणाले, “निर्बंधासह सामन्यांना परवानगी देण्यात आली आहे. लोकांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाणार नाही. जे आयपीएलमध्ये भाग घेत आहेत, त्यांना आयसोलेशनमध्ये राहावे लागेल. याच आधारावर आम्ही परवानगी दिली आहे.”
IPL permission has been granted, matches to be played with restrictions. People are not allowed to sit in the stadium, only relays can be done. Players and others involved in IPL will be required to isolate themselves at the same place: Maharashtra Minister Nawab Malik pic.twitter.com/1wTnJg4H8D
— ANI (@ANI) April 5, 2021
गांगुलीची प्रतिक्रिया
बीसीसीआय अध्यक्ष गांगुली म्हणाला, ”आम्हाला सरकारच्या वतीने सामना आयोजित करण्याची सर्व परवानगी मिळाली आहे. 10 ते 25 एप्रिल दरम्यान मुंबईत फक्त 10 सामने होणार आहेत. बायो बबलमध्ये कोणतीही समस्या नाही. आमच्याकडे एक अतिशय सुरक्षित सेटअप आहे, जिथे खेळाडू आणि सहाय्यक कर्मचारी पूर्णपणे सुरक्षित आहेत. चार संघ आपले सलामीचे सामने मुंबईत खेळणार आहेत. त्यात चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आहेत.”
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 5, 2021 1:36 pm