आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाखाली अडकलेले सुरेश कलमाडी व अभयसिंह चौताला यांना आजीव अध्यक्षपद देण्याचा निर्णय भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनकडून (आयओए) जोपर्यंत मागे घेतला जात नाही, तोपर्यंत आयओएशी फारकत घेतली जाणार आहे. याचप्रमाणे आयओए आपल्या निर्णयावर ठाम राहिल्यास त्यांची मान्यता काढून घेण्यात येईल, असा इशारा केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी दिला आहे.

‘‘भ्रष्टाचारी संघटकांना आयओएवर घेण्याचा निर्णय घटनाबाह्य़ व बेकायदेशीर आहे. हा निर्णय आम्हाला अजिबात मान्य नाही. आयओएचा निर्णय आम्हाला धक्कादायक असून त्यामुळे आयओएवरील विश्वास उडाला आहे,’’ असे गोयल यांनी सांगितले.

‘‘सर्व क्रीडा संघटनांच्या कारभारात पारदर्शकता, सचोटी पाहिजे. संघटनेच्या प्रत्येक व्यवहाराला त्यांच्या पदाधिकाऱ्यांवर उत्तरदायित्व असणे आवश्यक आहे. आजपर्यंत आम्ही अनेक वेळा काही चांगल्या सूचना केल्या आहेत, मात्र आयओएने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळेच आम्ही त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवली आहे. आयओएने या दोन्ही पदाधिकाऱ्यांना दूर करावे किंवा या संघटकांनी पदाचा राजीनामा द्यावा अन्यथा आम्हास आयओएबरोबरच संबंध तोडावे लागतील़,’’ असे गोयल यांनी सांगिले.

ते पुढे म्हणाले, ‘‘कारणे दाखवा नोटीस देण्याचा निर्णय राजकीय दृष्टीने घेतलेला नाही. भ्रष्टाचाराला आम्ही थारा देत नाही. भ्रष्टाचारी संघटकांना स्थान दिल्यास क्रीडा क्षेत्राबरोबरच सर्वसाधारण लोकांमध्येही आयओएविषयी गैरसमजूत निर्माण होणार आहे. आम्हाला ऑलिम्पिक चळवळीविषयी कमालीचा आदर आहे. क्रीडा संघटनांना स्वायत्तता देण्याबाबत आमची कोणतीच हरकत नाही. मात्र अशा संघटनांचा कारभार स्वच्छ प्रतिमेचा व नीटनेटका पाहिजे.’’