ग्रॅमी क्रेग स्मिथ, हा दक्षिण आफ्रिकेचा नव्हे, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक राजबिंडा संघनायक. सम्राट सिकंदराप्रमाणे स्मिथनेही जग जिंकण्याची असीम महत्त्वाकांक्षा जोपासली होती. त्यामुळेच एखाद्या उमद्या, मुत्सद्दी, शूरवीर राजाप्रमाणेच त्याची कारकीर्द बहरली आणि एका महत्त्वाच्या टप्प्यावर तिच्यापुढे पूर्णविराम द्यायलाही तो कचरला नाही. वय वष्रे ३३ हे तसे निवृत्तीचे वय मुळीच नाही. परंतु गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये गॅरी कर्स्टनने जेव्हा दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षकपद सोडले तेव्हापासून त्याच्या मनात निवृत्तीचे विचार डोकावू लागले होते. पायाच्या घोटय़ाला झालेल्या दुखापतीमुळे हा विचार आणखी पक्का होऊ लागला. दोनच महिन्यांपूर्वी जॅक कॅलिसने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली. कॅलिसला अजून २०१५चा विश्वचषक खेळण्याची इच्छा आहे. पण स्मिथने मात्र सर्व प्रकारच्या क्रिकेटला अलविदा केला. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटसाठी खरेतर हा आणखी एक मोठा धक्का आहे.
२००३च्या विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत दक्षिण आफ्रिकेच्या खराब कामगिरीचे तीव्र पडसाद उमटले आणि शॉन पोलॉककडून युवा स्मिथकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली. त्या वेळी स्मिथचे वय होते फक्त २२ वष्रे आणि ८२ दिवस. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात युवा कर्णधार ठरलेल्या स्मिथने मग पाचच वर्षांमध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेचे वर्चस्व दाखवून दिले. एक फलंदाज म्हणून स्मिथचे सातत्य लाजवाब होते. २००८मध्ये दक्षिण आफ्रिकेने क्रिकेट इतिहासात एक आगळी उंची गाठली. या वर्षांतील १५ कसोटी सामन्यांपैकी ११ सामने त्यांनी जिंकण्याची किमया साधली. आफ्रिकेने इंग्लंडला इंग्लंडमध्ये हरवले, भारतामध्ये मालिका बरोबरीत सोडवली, तर ऑस्ट्रेलियाला त्यांच्या भूमीवर पराभूत करण्याचा पराक्रम दाखवला. त्या वेळी तो फक्त २७ वर्षांचा होता. परंतु स्मिथच्या निवृत्तीप्रसंगी दक्षिण आफ्रिकेचा संघ जागतिक कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान होता. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे स्मिथच्या निवृत्तीची मालिका दक्षिण आफ्रिकेने १-२ अशा फरकाने गमावली, तीसुद्धा ऑस्ट्रेलियाविरुद्ध. कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक यशस्वी कर्णधार असे बिरुद मिरवणाऱ्या स्मिथला विजयी आविर्भावात यथोचित निरोप देता आला नाही, हीच खंत सर्वाना बोचत असेल.
याच स्मिथला ७ जानेवारी २००९ या दिवशी सिडनी क्रिकेट मैदानावर ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटरसिकांनी उभे राहून मानवंदना दिली होती. योगायोगाची गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या भूमीवरील ती मालिका दक्षिण आफ्रिकेने २-१ अशी जिंकली होती. खरेतर स्मिथला ऑस्ट्रेलियाविरुद्ध निभ्रेळ यश मिळवायचे होते. परंतु अखेरची कसोटी जिंकण्यात आफ्रिका अपयशी ठरली. स्मिथने त्या मालिकेत मालिकावीर पुरस्काराचा मान मिळवला होता. तिसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात मिचेल जॉन्सनच्या एका उसळत्या चेंडूमुळे स्मिथला दुखापत झाली आणि ३० धावांवर त्याला माघारी परतावे लागले होते. डाव्या हाताला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे तो दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरण्याची शक्यता जवळपास मावळली होती. मग अखेरच्या दिवशी कसोटीने अतिशय निर्णायक वळण घेतले. दक्षिण आफ्रिकेचे ९ फलंदाज बाद झालेले आणि कसोटी अनिर्णीत राखण्यासाठी पाहुण्या संघाला ८.२ षटके खेळून काढणे आवश्यक होती. परंतु सहजासहजी हार मानणे स्मिथला नामंजूर होते. डेल स्टेन आणि मखाय एन्टिनी यांचा नवव्या विकेटसाठी ६५ मिनिटे लढा चालू होता, त्या काळात स्मिथनेही मैदानावर जाण्याचा निर्णय घेतला. जॅक कॅलिसचे टी-शर्ट, पॉल हॅरिसचे स्वेटर घालून दुखऱ्या हातावर पॅड बांधून हा वीर सेनानी सज्ज झाला. पाच वेदनाशामक इंजेक्शन्स घेऊन हा लढवय्या संघनायक पॅड बांधून ११व्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला, तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटरसिकांनी खिलाडूवृत्तीने त्याचे अभिवादन केले. एन्टिनीला साथीला घेऊन २६ मिनिटे आणि १७ चेंडू त्याने धीराने लढा दिला. प्रत्येक चेंडू जेव्हा बॅटवर येऊन आदळायचा, तेव्हा तीव्र वेदना व्हायच्या. पण स्मिथला त्याचे मुळीच शल्य नव्हते. अखेर पाच मिनिटे आणि १० चेंडूंचा खेळ शिल्लक असताना जॉन्सननेच घात केला. या वेळी त्याने स्मिथचा त्रिफळा उडवला. पण स्मिथच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य कायम होते. ऑस्ट्रेलियावरील हा ऐतिहासिक विजय देशासाठी अभिमानास्पद क्षण होता.
निवृत्तीचा निर्णय घेताना कुटुंबवत्सल स्मिथचे आणखी एक रूप प्रत्ययास आले. आयरिश गायिका मॉर्गन डीने हिच्याशी ऑगस्ट २०११मध्ये स्मिथचा विवाह झाला. त्यामुळेच सरे काऊंटी संघाशी तो करारबद्ध झाला आणि दोन वर्षांपूर्वी तो कर्णधारही झाला. २५ जुलै २०१२ या दिवशी स्मिथ दाम्पत्याला कन्यारत्नाचा लाभ झाला. कॅडेन्से क्रिस्टिन स्मिथ असे मुलीचे नाव ठेवण्यात आले. परंतु दोन आठवडय़ांपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरी कसोटी चालू असताना दीड वर्षांची कॅडेन्से एका अपघातात गंभीररीत्या भाजली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेदरम्यान आणखी एका कौटुंबिक आव्हानाला स्मिथ धर्याने तोंड देत होता. अखेरच्या कसोटी सामन्यानंतर संघसहकाऱ्यांना आणि आपल्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या चाहत्यांना निरोप देऊन स्मिथ लगबगीने हॉस्पिटलमध्ये पोहोचला. याच सामन्याच्या चौथ्या दिवशी सकाळी ८ वाजता कॅडेन्सेवर शस्त्रक्रिया होती. तिथे हा पिता हजेरी लावून वेळेतच न्यूलँड्सवर परतला, आपल्या कारकिर्दीतील अखेरचा डाव साकारण्यासाठी. स्मिथ १६ मिनिटे मैदानावर होता, परंतु फक्त ३ धावांवर जॉन्सननेच त्याच्या कारकिर्दीपुढे
पूर्णविराम देण्याचे सोपस्कार
केले.
निवृत्तीप्रसंगीही तेच स्मित त्याच्या चेहऱ्यावर टिकून होते. ११६ कसोटी सामन्यांत प्रतिनिधित्व, यापैकी शंभरहून अधिक सामन्यांत नेतृत्व. २७ शतके आणि ३७ अर्धशतकांसह ९,२५७ धावा ही त्याची जमापुंजी. चाळिशीपर्यंत थांबला असता तर सचिनचा विश्वविक्रमही त्याच्यापुढे खुजा वाटला असता. २००३मध्ये स्मिथने इंग्लिश दौऱ्यावर दोन सलग द्विशतके साकारली होती. हर्षेल गिब्जसोबत सलामीसाठी त्याची चांगलीच जोडी जमायची. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम सलामीची जोडी अशी त्यांची ख्याती होती. दक्षिण आफ्रिकेच्या चार सर्वाधिक धावांच्या सलामीच्या भागीदाऱ्या स्मिथच्या नावावर आहेत. यापैकी तीन त्याने गिब्जसोबत साकारल्या आहेत. २००८मध्ये स्मिथने नील मॅकेन्झीसोबत बांगलादेशविरुद्ध ४१५ धावांची विश्वविक्रमी सलामी दिली होती. हा विक्रम अद्यापही अबाधित आहे. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटला वैभवाचे दिवस दाखवणारा कर्णधार आणि खंदा सलामीवीर या भूमिका यशस्वीपणे वठवणाऱ्या स्मिथची निवृत्ती म्हणजे एका सुवर्णयुगाचाच अस्त, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.