लिओनेल मेस्सी, नेयमार यांच्यासारखे अव्वल खेळाडू.. बचावपटूंची तगडी फौज.. प्रतिस्पध्र्याचे आक्रमण रोखणारा खंबीर गोलरक्षक.. अशी मजबूत स्थिती असतानाही बार्सिलोना संघ ला लिगा (स्पॅनिश लीग) स्पर्धेच्या जेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला आहे. शनिवारी रात्री झालेल्या लढतीत ग्रेनडाकडून १-० अशा पराभवाला सामोरे जावे लागल्याने बार्सिलोनाचे जेतेपद पटकावण्याचे स्वप्न धोक्यात आले आहे.
१६व्या मिनिटाला यासिने ब्राहिमीने एकमेव गोल करत ग्रेनडाला विजय मिळवून दिला. बार्सिलोनाच्या ढिसाळ बचावाचा फायदा उठवत ब्राहिमीने शानदार गोल केला. नेयमार तसेच मेस्सीने वारंवार गोल करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र ते अपुरेच ठरले.
काही दिवसांपूर्वी चॅम्पियन्स लीग स्पर्धेत अ‍ॅटलेटिको माद्रिदने बार्सिलोनाचे आव्हान संपुष्टात आणले होते. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत जेतेपद पटकावण्याचे बार्सिलोनाचे स्वप्नही या पराभवामुळे भंगले होते. या पराभवाच्या धक्क्य़ातून सावरण्याआधीच बार्सिलोनाला आणखी एका अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले. या निर्णयामुळे बार्सिलोनाचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी फेकला गेला आहे. रिअल माद्रिद आणि  अ‍ॅटलेटिको माद्रिद यांचे प्रत्येकी ७९ गुण झाले आहेत. रिअल माद्रिदने अल्मेरियाचा ४-० असा धुव्वा उडवत दिमाखदार विजय मिळवला. रिअलतर्फे अँजेल डि मारिया, गॅरेथ बॅले, इस्को आणि अल्वारो मोराटा यांनी प्रत्येकी एक गोल केला.