प्रो-कबड्डी लीगच्या पहिल्या हंगामाचीच पुनरावृत्ती दुसऱ्या हंगामाच्या सलामीच्या सामन्यात पाहायला मिळाली. अखेरच्या चढाईपर्यंत क्रीडारसिकांची उत्कंठा टिकवणाऱ्या या सामन्यात यु मुंबाने जयपूर पिंक पँथर्सचा २९-२८ असा एका गुणाने पराभव केला. प्रामुख्याने बचाव फळीचाच संघर्ष पाहायला मिळालेल्या या सामन्यात जिवा कुमार यु मुंबाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. दुसऱ्या लढतीमध्ये बंगळुरू बुल्सने बंगाल वॉरियर्सवर ३३-२५ अशी मात करून आपले खाते उघडले.
यु मुंबाचा कर्णधार अनुप कुमार आणि शब्बीर बापू यांच्या चढाया फारशा प्रभावी ठरल्या नाहीत, तर जयपूरकडून जसवीर सिंग, सोनू नरवाल आणि राजेश नरवाल यांना चढायांचे गुण वाढवण्यात अपयश आले. परंतु दोन्ही संघांच्या क्षेत्ररक्षकांनी आपले कौशल्य दाखवल्यामुळे सामन्याची रंगत अखेपर्यंत वाढत गेली.
मध्यंतराला यु मुंबाकडे १६-१५ अशी आघाडी होती. त्यानंतर सामना संपायला पाच मिनिटे शिल्लक असताना गुणफलक २५-२५ असा बरोबरीत होता. त्यानंतर शब्बीरने एक गुण घेतला, तर जयपूरच्या राजेश नरवालची पकड करण्याच्या प्रयत्नात शब्बीर स्वयंचित झाला आणि तरीही यु मुंबाकडे २७-२६ अशी एकाच गुणाची आघाडी होती. मग अनुपने चढाईत एक गुण मिळवला आणि जसवीरची पकड झाल्यामुळे मुंबईची आघाडी दोन गुणांनी वाढली. अनुपची अखेरच्या निर्णायक चढाईत पकड झाली आणि जयपूरने दोन गुण कमावले, परंतु तरीही एका गुणाच्या फरकाने यु मुंबाला विजयी सलामी नोंदवता आली.
विजयानंतर प्रतिक्रिया देताना यु मुंबाचा कर्णधार अनुप म्हणाला, ‘‘चढायांमध्ये आमच्या काही चुका झाल्या, त्या पुढील सामन्यात सुधारण्याचा आम्ही प्रयत्न करू. जिवाचे क्षेत्ररक्षण संघासाठी महत्त्वाचे ठरले.’’
दुसऱ्या सामन्यात पूर्वार्धात बंगाल वॉरियर्सने १६-१५ अशी एका गुणाची आघाडी घेतली होती; परंतु दुसऱ्या सत्रात बंगळुरूने अधिक आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. अजय ठाकूरच्या चढाया आणि मनजीत चिल्लरच्या पकडींनी बंगळुरूच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तर बंगाल वॉरियर्सकडून नीलेश शिंदेने दमदार पकडी केल्या. ‘‘अतिआत्मविश्वासाने खेळायचे नाही, असा आम्ही निर्धार केला होता. मी चढायांकडे लक्ष केंद्रित केले, तेव्हा मनजीतने पकडींचा भार खंबीरपणे सांभाळला,’’ अशी प्रतिक्रिया अजय ठाकूरने व्यक्त
केली.

भारताच्या या प्राचीन खेळाला प्रो कबड्डीमुळे नवा चेहरा मिळाला आहे. पहिल्या हंगामाप्रमाणे दुसऱ्या हंगामातही स्पर्धेला चाहत्यांचे प्रेम लाभेल. – सरबनंदा सोनोवाल, केंद्रीय क्रीडामंत्री

अमिताभ बच्चन यांच्या आवाजात राष्ट्रगीत
पांढराशुभ्र सलवार कुडता आणि काळे जॅकेट अशा पारंपरिक पेहरावात बॉलीवूडचे बादशाह आणि ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या धीरगंभीर आवाजातील राष्ट्रगीताने दुसऱ्या हंगामाची दिमाखदार सुरुवात झाली. बॉलीवूडनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतील प्रो कबड्डीच्या दुसऱ्या हंगामाच्या सलामीच्या दिवशी बरेच बॉलीवूडचे सेलिब्रेटी हजर होते.

महाराष्ट्रातील नागरिकांच्या रगारगात कबड्डी आहे. अतिशय सोपे नियम आणि कमीत कमी साहित्यात खेळला जाऊ शकणारा हा खेळ आहे. प्रो कबड्डीच्या निमित्ताने या खेळाला ग्लॅमर मिळाले आहे. स्पर्धेमुळे शालेय स्तरावर खेळाला लोकप्रियता मिळाली आहे. प्रत्येक शाळेत हा खेळ खेळला जावा. – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री