प्राग : भारताचा युवा ग्रँडमास्टर विदित गुजराथी याने अमेरिकेच्या सॅम शँकलँड याचा पराभव करत प्राग मास्टर्स बुद्धिबळ महोत्सवात विजयी सलामी नोंदवली.

पेंटाल्या हरिकृष्ण (२७१३ एलो रेटिंग गुण) याला मात्र ३६ चालींपर्यंत रंगलेल्या स्वीडनच्या निल्स ग्रँडेलियसविरुद्धच्या सामन्यात बरोबरीवर समाधान मानावे लागले. विदित आणि हरिकृष्ण हे नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक बुद्धिबळ महासंघाच्या (फिडे) क्रमवारीत भारतीयांमध्ये अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत.

शँकलँडने केलेल्या एकमेव चुकीचा फायदा उठवत विदितने प्रतिस्पध्र्यावर अधिक दबाव आणला. त्यानंतर या लढतीवर पूर्णपणे वर्चस्व गाजवत विदितने अवघ्या ३२ चालींमध्ये विजय साकारला. ‘‘सुरुवातीला अचूक चाली खेळण्यासाठी मी बराच वेळ घेतला. डावात सुधारणा करण्यासाठी मला योग्य रणनीती सापडत नव्हती. वेळ निघून जात असल्याने माझ्यावरील दबाव वाढला होता. पण विजय मिळवण्यात मी यशस्वी ठरलो,’’ असे २७२१ एलो रेटिंग गुणांची कमाई करणाऱ्या विदितने सांगितले.

पोलंडच्या अव्वल मानांकित यान-ख्रिस्तोफ डुडा आणि रशियाच्या निकिता विटियुगोव्ह यांनी पहिल्या डावात विजय मिळवले. डुडाने यजमान चेक प्रजासत्ताकच्या डेव्हिड नवारा याच्यावर सहज मात केली. निकिताने डेव्हिड अंतोन गुज्जारो याच्यावर विजय मिळवला. १० खेळाडूंचा समावेश असलेल्या या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत विदितला डेव्हिड गुज्जारो याचा तर हरिकृष्णला अव्वल मानांकित डुडा याचा सामना करावा लागेल.