माजी प्रशिक्षक विमल कुमार यांचे मत

नवी दिल्ली :

सायना नेहवाल ही मानसिकदृष्टय़ा भारतातील सर्वाधिक कणखर बॅडमिंटनपटू आहे. दुखापतींवर मात करून अधिक काळ देशासाठी खेळण्याची तिच्यात क्षमता असून यंदा ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्याची तिला चांगली संधी आहे, असे मत सायनाचे माजी प्रशिक्षक विमल कुमार यांनी व्यक्त केले.

गतवर्षी दुखापतींचा सामना करावा लागलेल्या सायनाने नुकतेच इंडोनेशिया मास्टर्सचे विजेतेपद पटकावले. कॅरोलिना मरिनला अंतिम सामन्यात दुखापत झाल्याने सायनाला विजेती घोषित करण्यात आले. त्याबाबत बोलताना विमल कुमार म्हणाले, ‘‘सायना ही भारताच्या अन्य खेळाडूंपेक्षा मानसिकदृष्टय़ा सर्वाधिक सक्षम आहे. अगदी पुरुष खेळाडूंच्या तुलनेतही ती काहीशी सरस आहे. एकदा ती कोर्टवर खेळायला उतरली की, केवळ प्रतिस्पध्र्याला कसे पराभूत करता येईल, इतकाच विचार ती करते.’’

‘‘याआधी मरिन आणि ताय त्झू यिंगला ऑल इंग्लंडचे दावेदार मानले जात होते. मात्र कॅरोलिनाला झालेली दुखापत पाहता, तिच्यात सुधारणा व्हायला कदाचित ५-६ महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे आता ऑल इंग्लंडच्या दावेदारीत सायना आणि सिंधूच्या शक्यतेत वाढ झाली आहे.

सायनाने यापुढे सरावाची सुनियोजित आखणी करून त्यानुसार खेळणे आवश्यक आहे. सायनाकडे ताय त्झू किंवा मरिनइतका वेग नसला तरी कणखरतेच्या बळावर ती प्रतिस्पध्र्याला पराभूत करण्यात यशस्वी होते.

त्याशिवाय यंदा ऑल इंग्लंड आणि पुढील वर्षी टोक्यो ऑलिम्पिक मध्येही दमदार कामगिरी करणे सायनाला शक्य आहे, ’’ असे मत विमल कुमार यांनी व्यक्त केले.