News Flash

महामुकाबला! पुरुषांच्या जेतेपदासाठी जोकोव्हिच-मरे यांच्यात झुंज

रॉजर फेडरर, राफेल नदाल हे दिग्गज बाद झाल्यानंतर नोव्हाक जोकोव्हिच आणि अँडी मरे यांच्यावर तमाम टेनिसरसिकांचे लक्ष केंद्रित झाले होते. घसरत्या हिरवळीच्या आव्हानाचा मुकाबला करीत

| July 7, 2013 05:02 am

रॉजर फेडरर, राफेल नदाल हे दिग्गज बाद झाल्यानंतर नोव्हाक जोकोव्हिच आणि अँडी मरे यांच्यावर तमाम टेनिसरसिकांचे लक्ष केंद्रित झाले होते. घसरत्या हिरवळीच्या आव्हानाचा मुकाबला करीत या दोघांनी टप्प्याटप्याने वाटचाल करत विम्बल्डनची अंतिम फेरी गाठली आहे. अंतिम फेरीपर्यंतची वाट खडतर होती, पण या दोघांनी सर्वस्व पणाला लावून विम्बल्डनचा झळाळता चषक उंचावण्याचे लक्ष्य जोपासले आहे. ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत हे दोघे तिसऱ्यांदा एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.
फेडरर ग्रँड स्लॅम जेतेपदाच्या शर्यतीत मागे पडला आहे, नदालची मक्तेदारी क्ले कोर्टपुरतीच सीमित राहिली आहे. या पाश्र्वभूमीवर टेनिसमध्ये खरी सत्ता कोणाची, याचा फैसला या सामन्याद्वारे होणार आहे. गेल्या वर्षी जोकोव्हिचलाच नमवत अँडी मरेने कारकीर्दीतील पहिल्या ग्रँड स्लॅम विजयाची नोंद केली. पण यावर्षीच्या पहिल्या ग्रँड स्लॅममध्ये मरेला चीतपट करत जोकोव्हिचने आपले वर्चस्व सिद्ध केले. फ्रेंच खुल्या स्पर्धेत या दोघांनाही जेतेपदाचे स्वप्न साकारता आले नव्हते. पण रविवारी जेतेपद नावावर करण्याची दोघांनाही समान संधी आहे. ब्रिटनची ग्रँड स्लॅम आशा मानल्या जाणाऱ्या मरेला या आशेचे प्रत्यक्ष जेतेपदात रुपांतर करायचे आहे, तर जागतिक टेनिसमध्ये ग्रास कोर्टवर दबदबा राखण्यासाठी जोकोव्हिच आतूर आहे.
मरेकडे एकमेव ग्रँड स्लॅम जेतेपद आहे तर जोकोव्हिचकडे सहा आहेत. कमीत कमी चुका आणि चिवट खेळ, सर्व फटक्यांवर प्रभुत्व जोकोव्हिचची खासियत आहे, तर बेसलाइनवरून जबरदस्त खेळ आणि वेग ही मरेची वैशिष्टय़े आहेत. या दोघांमधील १८ लढतींमध्ये जोकोव्हिच ११-७ असा आघाडीवर आहे. ग्रास कोर्टवरच्या एकमेव लढतीत मरेने बाजी मारली आहे. या स्पर्धेत आतापर्यंत जोकोव्हिचने सहज वाटचाल केली आहे, तर मरेने प्रचंड संघर्ष करूनच अंतिम फेरी गाठली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2013 5:02 am

Web Title: great combat jeckovich mare will take over mens final
Next Stories
1 अखेर कॅरेबियन बेटांवर भारताची विजयी बोहनी कोहलीचे शानदार शतक
2 झेल सुटल्यामुळे जडेजा-रैनात तू तू-मैं मैं
3 श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याला ब्राव्हो मुकणार
Just Now!
X