भारत-आफ्रिका क्रिकेट मालिका

युवा सलामीवीर शफाली वर्मा (३० चेंडूंत ६० धावा) आणि अनुभवी फिरकीपटू राजेश्वरी गायकवाड (३/९) यांच्या चमकदार कामगिरीमुळे भारतीय महिला संघाने तिसऱ्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा नऊ गडी आणि ५४ चेंडू राखून धुव्वा उडवला. पण आफ्रिकेने ही मालिका २-१ अशी जिंकली.

प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेला २० षटकांत ७ बाद ११२ धावाच करता आल्या. राजेश्वरीने अ‍ॅनेक बोश (०) आणि लिझेल ली (१२) या धोकादायक सलामी जोडीला लवकर माघारी पाठवून भारताच्या विजयाची पायाभरणी केली.

प्रत्युत्तरात भारताची सध्याची सर्वोत्तम फलंदाज शफालीने सात चौकार आणि पाच षटकारांची आतषबाजी करताना स्मृती मानधनासह (नाबाद ४८) पहिल्या गड्यासाठी ९६ धावांची भागीदारी रचली. त्यामुळे भारताने विजयी लक्ष्य ११ षटकांतच गाठले. राजेश्वरी सामनावीर, तर शफाली मालिकावीर पुरस्काराची मानकरी ठरली.