News Flash

भारतासोबत क्रिकेटसाठी तालिबानचा हिरवा कंदील

अफगाणिस्तानचा संघ ऑक्टोबरमध्ये टी-२० विश्वचषक मालिका खेळणार असून नंतर ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी सामना होबार्टमध्ये २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबरदरम्यान खेळणार आहे.

taliban cricket
तालिबानचा क्रिकेटला पाठिंबा असल्याचं अफगाण क्रिकेट बोर्डाने म्हटलं आहे. (प्रातिनिधिक फोटो)

अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या नेतृत्तावाखालील राजवटीमध्ये खेळांना प्रोत्साहन दिलं जाण्याचे संकेत मिळत आहेत. अफगाणिस्तान क्रिकेट नियमक मंडळाने द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना अफगाणिस्तानचा संघ यंदाच्या वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. पहिल्यांदाच अफगाणिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियाविरोधात कसोटी सामना खेळणार असून या दौऱ्यासाठी तालिबानने हिरवा कंदील दाखवल्याचं अफगाण क्रिकेट मंडळाने स्पष्ट केलंय. अफगाण क्रिकेट नियामक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हमिद शिनवारी यांनी यासंदर्भातील माहिती दिलीय. ऑस्ट्रेलिया दौराच नाही तर भारताविरोधातील कसोटी मालिका खेळण्यासाठीही अफगाणिस्तानचा संघ दौरा करण्याची शक्यता हमिद यांनी व्यक्त केलीय.

“तालिबान सरकारचा क्रिकेट खेळण्याचा पाठिंबा आहे. त्यामुळेच नियोजित वेळापत्रकानुसार आमच्या संघाचे सर्व दौरे पार पडणार आहेत. तालिबान संस्कृतिक विभागाच्या प्रवक्त्यांनी ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी सामन्यासाठी समर्थन देत असल्याचं आम्हाला कळवलं आहे. तसेच त्यांनी २०२२ च्या पहिल्या तिमाहीमध्ये भारताविरोधातील कसोटी मालिकेसाठीही त्यांनी परवानगी दिलीय,” असं हमिद म्हणालेत.

अफगाणिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी सामना होबार्टमध्ये २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबरदरम्यान खेळणार आहे. हा सामना खरं तर मागील वर्षी म्हणजेच २०२० रोजी खेळवला जाणार होता. मात्र करोना आणि त्यामुळे असणाऱ्या प्रवास निर्बंधांमुळे तो पुढे ढकलण्यात आला. ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी अफगाणिस्तानचा संघ युएईमध्ये होणाऱ्या टी २० वर्ल्डकपमध्ये खेळताना दिसेल. १७ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरदरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. मात्र अफगाणिस्तान क्रिकेट संघाची पाकिस्तानबरोबरची एकदिवसीय क्रिकेट मालिका पुढील वर्षी खेळवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. “आम्ही सध्या टी-२० मालिकेवर लक्ष केंद्रीत केलं आहे. वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेसोबत ही मालिका होणार आहे. ही मालिका टी-२० विश्वचषकाआधी युएईमध्येच खेळवली जाईल. कतारमध्ये आम्ही शिबीर आयोजित करणार आहोत. हे शिबीर या मालिकेआधीच आयोजित केलं जाणार आहे,” असं हमिद यांनी सांगितलं आहे.

“त्यांचा (तालिबानचा) क्रिकेटला पाठिंबा असून आम्हाला त्यांच्याकडून मालिकांसाठी हिरवा कंदील मिळालाय. या माध्यमातून त्यांनी तरुणांना संदेश दिला आहे की त्यांचा खेळांना पाठिंबा आहे. हे फार चांगले संकेत आहेत,” असं हमिद म्हणालेत. २००१ साली तालिबानची सत्ता गेल्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट संघाची स्थापना झाली. त्यानंतर या संघाने भन्नाट कामगिरी करत अल्पावधीमध्ये जगभरामध्ये नाव कमावलं. त्यांना कसोटी क्रिकेट खेळणारा संघ म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीकडून २०१७ साली मान्यता मिळाली.

एकीकडे पुरुषांना क्रिकेटसाठी परवानगी देण्यात आली असली तरी महिला क्रिकेटच्या भविष्यासंदर्भात विचारण्यात आलं असता, “आम्ही काहीच ठाऊक नाही. याबद्दल सरकारच निर्णय घेईल,” असं हमिद म्हणाले. मागील वर्षीच आफगाण क्रिकेट बोर्डाने २५ महिला क्रिकेटपटूंसोबत करार केला होता. मात्र आता महिला क्रिकेट संघ बरखास्त करण्यात आला आहे. तालिबानची महिलासंदर्भातील धोरणं फारच कठोर असल्याने हा निर्णय़ घेण्यात आलाय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2021 9:26 am

Web Title: green signal from taliban afghanistan board eyes australia india tours scsg 91
Next Stories
1 पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धा : नियमाच्या उल्लंघनामुळे सुयश जाधव अपात्र
2 प्रो कबड्डी लीग : प्रो कबड्डी लिलावाच्या अर्थकारणात ५.२८ टक्के घसरण
3 अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा : जोकोव्हिचची विजयी सलामी
Just Now!
X