न्यूझीलंड क्रिकेटचे प्रमुख ग्रेग बार्कले यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचे (आयसीसी) नवे कार्याध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.

बार्कले यांनी कार्याध्यक्षपदाच्या शर्यतीत असणाऱ्या सिंगापूरच्या इम्रान ख्वाजा यांना ११-५ या फरकाने नमवले. भारताचे सध्याचे ‘आयसीसी’चे कार्याध्यक्ष शशांक मनोहर यांचे उत्तराधिकारी म्हणून बार्कले काम पाहतील. १६ क्रिकेट मंडळांच्या संचालकांनी या निवडणुकीत मतदान केले. त्या निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी कसोटी खेळणाऱ्या १२ देशांच्या क्रिकेट मंडळांच्या अध्यक्षांचा समावेश होता. तसेच तीन संलग्न देश आणि एक स्वतंत्र महिला संचालक (पेप्सिकोच्या इंद्रा नूयी) यांचा मतदान करणाऱ्यांमध्ये सहभाग होता.

निवडणुकीत दुसरी फेरी चुरशीची होती. मात्र त्यात बार्कले यांना दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाकडून भक्कम पाठिंबा मिळाला. आयसीसी कार्याध्यक्ष होण्यासाठी नियमाप्रमाणे ११ मते असणे  गरजेचे आहे. ती मते बार्कले यांना मिळाली. भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांच्या क्रिकेट मंडळांनी बार्कले यांच्या बाजूने मतदान केल्याचे समजते. बार्कले हे ऑकलंडस्थित व्यावसायिक वकील असून न्यूझीलंड क्रिकेट मंडळाचे २०१२ पासून अध्यक्ष आहेत. आता लवकरच ते त्यांच्या देशाच्या क्रिकेट मंडळाचा राजीनामा देतील. बार्कले यांनी २०१५च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतही संचालक म्हणून जबाबदारी सांभाळली होती.

करोना संसर्गामुळे जगभरात आर्थिक संकट निर्माण झाले असले तरी क्रिकेट खेळाची लोकप्रियता कायम ठेवण्यासाठी आयसीसीचा प्रयत्न असेल. अव्वल तीन (भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड) ही क्रिकेट देशांची असणारी संकल्पना बदलण्याची गरज आहे. दोन देशांमधील मालिकांबरोबरच आयसीसीच्या जागतिक स्तरावरील विश्वचषकासारख्या स्पर्धादेखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत.

– ग्रेग बार्कले