सुदीप चटर्जीची शतकी खेळी
फलंदाजीस पोषक असलेल्या खेळपट्टीचा पुरेपूर फायदा घेत बंगाल संघाने महाराष्ट्रविरुद्धच्या रणजी क्रिकेट सामन्यात सोमवारी पहिल्या डावात ८ बाद ५२८ धावांचा डोंगर रचला. सुदीप चटर्जी याने केलेले शानदार शतक हे त्यांच्या डावाचे वैशिष्टय़ ठरले.
गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात बंगालने ३ बाद २३९ धावांवर पहिला डाव पुढे सुरू केला. खेळपट्टीवर टिच्चून राहून मोठी धावसंख्या रचण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवीत त्यांनी खेळ केला. सुदीप याने शतक टोलवितानाच श्रीवत्स गोस्वामी (५१) व पंकजकुमार शॉ (५७) यांच्या साथीत शतकी भागीदारी रचल्या. शेवटच्या फळीत अमीर गनी यानेही अर्धशतक टोलवित महाराष्ट्राची गोलंदाजी निष्प्रभ असल्याचे दाखवून दिले.
महाराष्ट्राच्या प्रभाव व दिशाहीन गोलंदाजीचा फायदा घेत श्रीवत्स व सुदीप यांनी चौथ्या विकेटसाठी १०४ धावांची भर घातली. श्रीवत्स याने शैलीदार खेळ करीत १० चौकारांसह ५१ धावा केल्या. त्याच्या जागी आलेल्या पंकज यानेही त्याचाच वारसा पुढे ठेवीत सुदीपला चांगली साथ दिली. या जोडीने पाचव्या विकेटसाठी १२९ धावांची भर घातली आणि संघास चारशे धावांपलीकडे नेले. पंकज याने आकर्षक खेळ करीत ५७ धावा टोलविल्या. सुदीप याने ४५५ मिनिटांचा खेळ करीत १४७ धावा केल्या. त्यामध्ये १९ चौकारांचा समावेश होता. हे दोघेही बाद झाल्यानंतर गनी याने आत्मविश्वासाने खेळ करीत ५९ धावा टोलविल्या. त्यामध्ये त्याने सहा चौकार मारले. वीरप्रतापसिंग याने २८ धावा करीत त्याला साथ दिली. या दोन्ही खेळाडूंच्या फटकेबाजीमुळे बंगालने पाचशे धावांचाही टप्पा ओलांडला. महाराष्ट्राकडून चिराग खुराणा याने सर्वाधिक चार बळी घेतले.
सामन्याचे अद्याप दोन दिवस बाकी असल्यामुळे पहिल्या डावात आघाडी मिळविण्याची बंगाल संघास जास्त संधी आहे.

संक्षिप्त धावफलक
बंगाल पहिला डाव १८० षटकांत ८ बाद ५२८ (सुदीप चटर्जी १४७, श्रीवत्स गोस्वामी ५१, पंकजकुमार शॉ ५७, अमीर गनी ५९, वीरप्रतापसिंग २८, चिराग खुराणा ४/१४१, समाद फल्ला २/१०२).