महिला विश्वचषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेचा सातवा हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. एव्हाना प्रत्येक संघ विश्वचषकाच्या तयारीत मग्न असून चाहतेही आपापल्या आवडत्या संघाला पाठिंबा दर्शवण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांतील संघांचा घेतलेला हा वेगवान आढावा.

‘अ’ गट

भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका, बांगलादेश

भारत

  •  सर्वोत्तम कामगिरी : उपांत्य फेरी (२००९, २०१०, २०१८)
  •  लक्षवेधी खेळाडू : स्मृती मानधना

‘अ’ गटात सहभागी असलेल्या भारतीय संघाला यंदा विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. कर्णधार हरमप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचा योग्य ताळमेळ साधण्यात आला आहे. मात्र सांगलीच्या स्मृती मानधनावर या संघांची सर्वाधिक मदार आहे. गोलंदाजीत राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव आणि राधा यादव या फिरकी त्रिकुटावर भारताची भिस्त आहे. परंतु शफाली वर्मा, रिचा घोष आणि जेमिमा रॉड्रिग्ज या युवा त्रिमूर्तीवर अतिअवलंबून राहणे आणि हरमनप्रीतची गेल्या काही महिन्यांतील सुमार कामगिरी भारतासाठी धोकादायक ठरू शकते.

ऑस्ट्रेलिया

  •  सर्वोत्तम कामगिरी : विजेतेपद (२०१०, २०१२, २०१४, २०१८)
  •  लक्षवेधी खेळाडू : एलिस पेरी

गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत नमवणे कोणत्याही संघासाठी सर्वाधिक आव्हानात्मक असणार आहे. विश्वातील सर्वोत्तम महिला अष्टपैलू एलिस पेरी, मेग लॅनिंग, एलिसा हिली या खेळाडूंवर ऑस्ट्रेलियाची सर्वाधिक भिस्त असून भारताविरुद्धच्या सामन्याने ते विश्वचषकाच्या अभियानाला प्रारंभ करणार आहेत.

  न्यूझीलंड

  •  सर्वोत्तम कामगिरी : उपविजेतेपद (२००९, २०१०)
  •  लक्षवेधी खेळाडू : सुझी बेट्स

न्यूझीलंडच्या पुरुष संघाप्रमाणेच महिलांचा संघसुद्धा कोणत्याही ‘आयसीसी’ स्पर्धेत धक्कादायक कामगिरी करू शकतो. सुझी बेट्स, सोफी डिवाइन यांसारखे प्रतिभावान खेळाडू या संघात असल्याने त्यांना किमान उपांत्य फेरीपर्यंत मजल मारण्याची संधी नक्कीच आहे.

श्रीलंका

  •  सर्वोत्तम कामगिरी : पहिली फेरी (सर्व विश्वचषकांमध्ये)
  •  लक्षवेधी खेळाडू : चामरी अटापटू

२०१७च्या एकदिवसीय विश्वचषकात श्रीलंकेसाठी सर्वाधिक धावा करणारी चामरी अटापटू यावेळी संघाला प्रथमच ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारून देणार का, हे पाहणे रंजक ठरेल. त्यांची सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडशी गाठ पडणार आहे.

  बांगलादेश

  •  सर्वोत्तम कामगिरी : पहिली फेरी (२०१४, २०१६, २०१८)
  •  लक्षवेधी खेळाडू : जहानरा आलम

सलग चौथ्या विश्वचषकासाठी पात्र ठरलेल्या बांगलादेशमध्ये गटातील नामांकित संघांना धक्का देण्याची क्षमता असून अनुभवी खेळाडू जहानरा आलम हिच्यावर त्यांची प्रामुख्याने मदार आहे. बांगलादेशलासुद्धा यंदा प्रथमच उपांत्य फेरी गाठण्याची संधी आहे.

‘ब’ गट

इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, पाकिस्तान, थायलंड

  इंग्लंड

  •  सर्वोत्तम कामगिरी : विजेतेपद (२००९)
  •  लक्षवेधी खेळाडू : अन्या श्रुबसोल

माजी विजेत्या इंग्लंडच्या संघात अनेक अनुभवी खेळाडूंचा भरणा असून किमान उपांत्य फेरीतील त्यांचे स्थान पक्के मानले जात आहे. गतवर्षी उपविजेतेपदावर समाधान मानाव्या लागणाऱ्या इंग्लंडच्या अ‍ॅन्या श्रुबसोलच्या कामगिरीवर सर्वाची नजर असेल.

  दक्षिण आफ्रिका

  •  सर्वोत्तम कामगिरी : उपांत्य फेरी (२०१४)
  •  लक्षवेधी खेळाडू : शबनिम इस्माइल

डेन व्हॅनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघामध्ये अनेक प्रतिभावान खेळाडूंचा समावेश असूनही त्यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश येत आहे. भारताविरुद्धच्या मालिकेत अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या शबनिम इस्माइलकडून यंदा आफ्रिकेला फार अपेक्षा आहेत.

  वेस्ट इंडिज

  • सर्वोत्तम कामगिरी : विजेतेपद (२०१६)
  •  लक्षवेधी खेळाडू : स्टेफानी टेलर

ट्वेन्टी-२० सामन्याला साजेशा खेळाडूंचा भरणा असलेल्या वेस्ट इंडिजचा स्पर्धेतील सर्वच संघांना धसका असेल. स्टेफानी टेलरच्या नेतृत्वाखाली खेळणारा विंडीजचा संघ यंदा २०१६ची पुनरावृत्ती करणार का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

पाकिस्तान

  • सर्वोत्तम कामगिरी : पहिली फेरी (सर्व विश्वचषकांमध्ये)
  •  लक्षवेधी खेळाडू : बिस्मा मारुफ

मानसिक समस्येमुळे कर्णधार साना मिरने क्रिकेटपासून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेतली असल्याने बिस्मा मारुफवर पाकिस्तानच्या आशा टिकून आहेत. पहिल्याच लढतीत त्यांच्यापुढे धोकादायक विंडीजचे आव्हान असणार आहे.

थायलंड

  •  सर्वोत्तम कामगिरी : प्रथमच विश्वचषकासाठी पात्र
  •  लक्षवेधी खेळाडू : नताया बुचॅथ

प्रथमच विश्वचषकासाठी पात्र ठरलेल्या थायलंडमध्ये या स्पर्धेत धक्कादायक विजयाची नोंद करून सर्वाना त्यांची दखल घेण्यास भाग पाडण्याची नामी संधी आहे. २०१९मधील थायलंडच्या सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळवणाऱ्या नताया बुचॅथचा खेळ पाहण्यासाठी जगभरातील क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत.

(संकलन : ऋषिकेश बामणे)