भारताच्या ग्रँडमास्टर सहज ग्रोव्हर व विदित गुजराथी यांनी जागतिक कनिष्ठ बुद्धिबळ स्पर्धेतील आठव्या फेरीअखेर संयुक्तरीत्या तिसरे स्थान घेतले आहे.
आठव्या फेरीत ग्रोव्हर याने इराणच्या पोया इदानीविरुद्ध विजय मिळविण्याची संधी गमावली व बरोबरी स्वीकारली. गुजराथी याने पोलंडच्या मार्सेल कानारेकविरुद्ध शानदार विजय मिळविला. त्याने काळ्या मोहरांच्या साहाय्याने खेळताना कल्पक चाली करीत हा डाव जिंकला. तैमानोव्ह सिसिलीयनच्या या डावात गुजराथी याने सुरुवातीस एक प्यादे जिंकून तेथून डावावर नियंत्रण मिळविले आणि अखेपर्यंत टिकविले.
इदानी याला ग्रोव्हरविरुद्धच्या लढतीत सुरुवातीस खूप खराब खेळ केला. त्याचा फायदा घेत डाव जिंकण्याची संधी ग्रोव्हर याला मिळाली होती मात्र त्याला स्वत:च्या खेळावरच नियंत्रण ठेवता आले नाही. त्याने दोन-तीन मोहरे गमावले. साहजिकच डाव वाचविण्यासाठी त्याने इदानीपुढे बरोबरीचा प्रस्ताव मांडला. इदानी याने हा प्रस्ताव लगेच मान्य केला. ग्रोव्हर व गुजराथी यांचे प्रत्येकी सहा गुण झाले आहेत. भारताच्या एस.सेतुरामन याला अ‍ॅलेक्झांडर इपातोव्ह याच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. राकेश कुलकर्णी याने एर्किन काराकोवला पराभूत करीत आपली गुणसंख्या चार केली आहे. चीनच्या युई यांगयेई याने अ‍ॅलेक्झांडर इपातोव्हच्या साथीने सात गुणांसह आघाडी घेतली आहे.
मुलींच्या गटात भारताच्या पद्मिनी राऊत हिने आघाडीवर असलेल्या आलुया वार्दा मेदिया या इंडोनेशियाच्या खेळाडूवर सनसनाटी विजय नोंदविला. तिचे आता सहा गुण झाले आहेत. इरिना बुल्मागा व एलिना काशिलिनास्काया यांनी प्रत्येकी साडेसहा गुणांसह आघाडी घेतली आहे. भारताच्या ऋचा पुजारी हिने व्लादा स्विरिदोवा या रशियन खेळाडूला बरोबरीत रोखले. तिचे साडेचार गुण झाले आहेत. जे.शरण्या हिने नूर गनी गेमेझ हिला पराभूत करीत आपली गुणसंख्या साडेचार केली आहे. रिया सावंत हिने एझगी अदानमिस हिच्यावर शानदार विजय मिळविला. तिचे चार गुण झाले आहेत.