भारताच्या सहज ग्रोव्हर व विदित गुजराथी यांनी चौथ्या फेरीअखेर संयुक्तरीत्या चौथ्या स्थानावर झेप घेत ग्रँड युरोप गोल्डन सँड्स आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत पदक मिळविण्याच्या आशा कायम राखल्या. त्यांचे प्रत्येकी साडेतीन गुण झाले आहेत. ग्रोव्हर याने मोल्डोवाच्या दिमित्री स्वेतुश्किन याला बरोबरीत रोखले. गुजराथी याला रशियाच्या डेव्हिड पाराविन याच्याविरुद्ध बरोबरी स्वीकारावी लागली. झिनेक ऱ्हासेक (चेक प्रजासत्ताक), व्लादिस्लाव्ह नेव्हेदिची (रुमानिया), तामिर नाबाटी (इस्त्रायल) यांनी प्रत्येकी चार गुणांसह आघाडी कायम राखली आहे. त्यांनी चौथ्या फेरीत आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंवर सहज विजय संपादन केला. ग्रँडमास्टर्स एन. श्यामसुंदर, एम.व्यंकटेश, जी.एन.गोपाळ, दीप सेनगुप्ता व एस. अरुण प्रसाद यांचे प्रत्येकी तीन गुण झाले आहेत. आर.भारती या भारतीय खेळाडूने भारताचाच राष्ट्रीय विजेता जी. आकाश याला बरोबरीत ठेवले आणि महिला ग्रँडमास्टर किताबाचा निकष मिळविण्याच्या दिशेने वाटचाल केली. तिचे अडीच गुण झाले आहेत.