विजय हजारे चषक क्रिकेट स्पर्धा
कर्णधार पार्थिव पटेलच्या महत्त्वपूर्ण अर्धशतकाच्या जोरावर गुजरातने विजय हजारे चषक स्पध्रेत विदर्भवर दोन विकेट राखून विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. पार्थिवला अक्षर पटेलने नाबाद ३६ धावांची खेळी करून चांगली साथ दिली. १९६ धावांचे लक्ष्य गुजरातने ४८.१ षटकांत आठ बळींच्या मोबदल्यात हे पूर्ण केले. उपांत्य फेरीत त्यांच्यासमोर तामिळनाडूचे आव्हान असेल.
प्रथम फलंदाजी करताना विदर्भकडून जितेश शर्मा (५१), फैझ फजल (५२) आणि गणेश सतीश (४७) या अव्वल तीन खेळाडूंनी दमदार खेळ केला. मात्र हे आघाडीचे तीन फलंदाज माघारी परतल्यानंतर विदर्भचा डाव गडगडला. जसप्रीत बुमराह, रुजूल भट व अक्षर पटेल यांनी विदर्भचा डाव ४८ षटकांत १९५ धावांत गुंडाळला.
या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातचीही दैना झाली होती. कर्णधार पटेल याने ५७ धावांची खेळी करून गुजरातला विजयासमीप आणले, परंतु तो बाद होताच गुजरातची पुन्हा घसरण सुरू झाली. रवीकुमार ठाकूर, अक्षय वाखारे व अक्षय कारनेवार यांनी गुजरातला हादरे दिले. मात्र अष्टपैलू अक्षर पटेलने खिंड लढवीत गुजरातचा विजय निश्चित केला.
संक्षिप्त धावफलक
विदर्भ : ४८ षटकांत १९५ (फैझ फजल ५२, जितेश शर्मा ५१, गणेश सतीश ४७; जसप्रीत बुमराह ४/३८) पराभूत वि. गुजरात : ४८.१ षटकांत ८ बाद १९८ (पार्थिव पटेल ५७, अक्षर पटेल नाबाद ३६; रवीकुमार ठाकूर ३/४६, अक्षय वाखारे ३/३०).
सतीशचा अष्टपैलू खेळ; तामिळनाडू उपांत्य फेरीत
बंगळुरू : राजगोपाळ सतीशच्या (नाबाद ३४ व एक बळी) अष्टपैलू खेळाच्या जोरावर तामिळनाडूने अटीतटीच्या सामन्यात उत्तर प्रदेशवर एक विकेटने विजय मिळवीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. विजयासाठीचे १६८ धावांचे माफक लक्ष्य पार करताना तामिळनाडूची तारांबळ उडाली. मात्र, सतीशने संयमी खेळ करीत नाबाद ३४ धावांची खेळ करून ४१.३ षटकांत संघाला विजय मिळवून दिला.
संक्षिप्त धावफलक
उत्तर प्रदेश : ४८.२ षटकांत १६८ (रिंकू सिंग ६०, पीयूष चावला २९; लक्ष्मीपती बालाजी ३/३२, आर. अश्विन २/२७) पराभूत वि. तामिळनाडू : ४१.३ षटकांत ९ बाद १६९ (मुरली विजय ३३, बाबा इंद्रजीत ४८, आर. सतीश नाबाद ३४; भुवनेश्वर कुमार ३/२५, पीयूष चावला ३/४५).