कोलकातावर सहा विकेट्सनी विजय; ड्वेन स्मिथचे ८ धावांत ४ बळी; सुरेश रैनाची अर्धशतकी खेळी
स्फोटक फलंदीजासाठी प्रसिद्ध ड्वेन स्मिथने भेदक गोलंदाजीचा नमुना सादर करताना गुजरात लायन्सला बलाढय़ कोलकाता नाइट रायडर्स संघावर दणदणीत विजय मिळवून दिला. स्मिथच्या आक्रमणापुढे कोलकाताच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली आणि त्यांना केवळ १२४ धावांची मजल मारता आली. ‘बाप’ होऊन परतलेल्या सुरेश रैनाच्या अर्धशतकी बळावर गुजरातने हे आव्हान पेलले. या विजयासह गुजरातने बाद फेरीच्या दिशेने दमदार पाऊल टाकले.
माफक लक्ष्याचा पाठलाग करताना धडाकेबाज स्मिथ भोपळाही न फोडता तंबूत परतला. ब्रेंडन मॅक्क्युलम ६ धावा करुन माघारी परतला. सुरेश रैनाने दिनेश कार्तिकच्या साथीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मॉर्ने मॉर्केलने कार्तिकला बाद केले. रैना आणि आरोन फिंच जोडीने चौथ्या विकेटसाठी ५९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात फिंच धावचीत झाला. त्याने २६ धावा केल्या. यानंतर रैनाला रवींद्र जडेजाची साथ मिळाली. रैनाने ३६ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकारासह ५३ धावांची निर्णायक खेळी साकारली.
तत्पूर्वी, गुजरातने अचूक मारा आणि अप्रतिम क्षेत्ररक्षणाच्या बळावर कोलकाताला निर्धारित २० षटकांत ८ बाद १२४ धावांत रोखले. चोरटी धाव घेण्यासाठी प्रयत्नशील असलेला कोलकाताचा कर्णधार गौतम गंभीरला शाबाद जकातीने धावबाद करून गुजरातला पहिले यश मिळवून दिले. गंभीर बाद झाल्यानंतर आलेल्या मनिष पांडेला स्मिथने माघारी धाडून गुजरातचा आनंद द्विगुणित केला. त्यापाठोपाठ सलामीवीर रॉबिन उथप्पा आणि पियुष चावलाही स्मिथच्या गोलंदाजीवर बाद झाले. कोलकाताला या धक्क्यातून डोके वर काढण्याची संधी न देता गुजरातच्या गोलंदाजांनी चोख कामगिरी बजावली. युसूफ पठाणने सर्वाधिक ३६ धावा केल्या. स्मिथने ८ धावांच्या मोबदल्यात ४ बळी टिपले.

संक्षिप्त धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स : ८ बाद १२४ (रॉबीन उथप्पा २५, युसूफ पठाण ३६; ड्वेन स्मिथ ४/८) पराभूत वि. गुजरात लायन्स : १३.३ षटकांत ४ बाद १२५ (सुरेश रैना ५३, आरोन फिंच २६; सुनील नरिन १/३०)