ब्रेंडन मॅक्क्युलम, सुरेश रैनाची निर्णायक भागीदारी
सर्वागीण सुरेख खेळाच्या जोरावर गुजरात लायन्स संघाने तुल्यबळ मुंबई इंडियन्स संघावर विजय मिळवत बाद फेरीत धडक मारली. या पराभवामुळे मुंबई इंडियन्सला बाद फेरीसाठी आता गणितीय समीकरणांवर अवलंबून राहावे लागणार आहे. गुजरातने मुंबईला १७२ धावांत रोखले. ब्रेंडन मॅक्क्युलम व सुरेश रैना या अनुभवी शिलेदारांच्या भागीदारीच्या बळावर गुजरातने सहा विकेट्स राखून हे आव्हान पेलले. दणदणीत विजयासह गुजरातने गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली व बाद फेरीतील स्थान पक्के केले.
लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातने पहिल्याच षटकात आरोन फिंचला गमावले. यानंतर मॅक्क्युलम आणि रैना यांनी ५४ चेंडूत ९६ धावांची भागीदारी साकारली. मॅक्क्युलमने ८ चौकार आणि एका षटकारासह २७ चेंडूंत ४८ धावा केल्या. जसप्रीत बुमराहने रैनाची खेळी संपुष्टात आणली. त्याने ८ चौकार आणि २ षटकारांसह ५८ धावांची खेळी साकारली. रैना बाद झाल्यानंतर ड्वेन स्मिथने २३ चेंडूंत ३७ धावा करत गुजरातला विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी, मुंबई इंडियन्सने नितीश राणाच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर १७२ धावांची मजल मारली. बटलरने ३३ धावा केल्या. राणाने ७ चौकार आणि ४ षटकारांसह ७० धावांची वेगवान खेळी साकारली.

संक्षिप्त धावफलक
मुंबई इंडियन्स : २० षटकांत ८ बाद १७२ (नितीश राणा ७०; ड्वेन ब्राव्हो २/२२) पराभूत विरुद्ध गुजरात लायन्स : १७.५ षटकांत ४ बाद १७३ (सुरेश रैना ५८, ब्रेंडन मॅक्क्युलम ४८, ड्वेन स्मिथ ३७; विनय कुमार २/१७)

सामनावीर : सुरेश रैना.

Untitled-36