सलग तिसऱ्यांदा अर्धशतक झळकावत सलामीवीर आरोन फिंच गुजरात लायन्सच्या विजयाचा शिल्पकार ठरला. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात फिंचने चौकार लगावल्यामुळे गुजरातला विजयी हॅट्ट्रिक साधता आली. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने १४३ धावा केल्या होत्या. गुजरातने फिंचच्या दमदार खेळीच्या जोरावर हे आव्हान तीन विकेट्स राखून पूर्ण केले.

मुंबईच्या आव्हानाचा पाठालाग करताना गुजरातला दुसऱ्याच षटकात पहिला धक्का बसला. त्यानंतर सलामीवीर फिंच आणि कर्णधार सुरेश रैना (२७) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी रचली. वेगवान गोलंदाज मिचेल मॅक्लेघनने उसळता चेंडू टाकत रैनाला माघारी धाडले. रैना बाद झाल्यावर गुजरातच्या डावाला उतरती कळा लागली. ड्वेन ब्राव्होच्या (२) बॅटला चेंडू लागलेला नसतानाही त्याला बाद देण्यात आले आणि गुजरातला मोठा हादरा बसला. एका बाजूने फलंदाज बाद होत असताना फिंच मात्र दमदार फलंदाजी करत होता. १७व्या षटकात थर्ड मॅनला चौकार मारत फिंचने स्पर्धेतील सलग तिसरे अर्धशतक पूर्ण केले. फिंचने सात चौकार व एका षटकाराच्या जोरावर नाबाद ६७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली आणि संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

वानखेडेवर नाणेफेक जिंकून गुजरातने मुंबईला फलंदाजीसाठी पाचारण करत त्यांना १४३ धावांमध्ये रोखले. गुजरातमधल्या मुंबईच्या खेळाडूंनी यावेळी भेदक गोलंदाजी केली. प्रवीण तांबे आणि धवल कुलकर्णी यांनी टिच्चून मारा करत मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना चांगलेच जखडून ठेवले होते. पार्थिव पटेलने यावेळी थोडासा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, त्याने प्रत्येकी दोन चौकार आणि षटकारांच्या जोरावर ३४ धावा केल्या. टीम साऊदी (२५) आणि कुणाल पांडय़ा (२०) यांनी अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी केल्यामुळे संघाला १४३ धावा करता आल्या. कर्णधार रोहित शर्मा, किरॉन पोलार्ड आणि हार्दिक पंडय़ा यांना दोन अंकी धावसंख्याही उभारता आली नाही.

संक्षिप्त धावफलक

मुंबई इंडियन्स : २० षटकांत ८ बाद १४३ (पार्थिव पटेल ३४, टीम साऊदी २५; प्रवीण तांबे २/१२, धवल कुलकर्णी २/१९) पराभूत वि. गुजरात लायन्स : २० षटकांत ७ बाद १४७ (आरोन फिंच नाबाद ६७; मिचेल मॅक्लेघन ४/२१)