शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार ठरलेल्या लढतीत गुजरात लायन्सने रायझिंग पुणे सुपरजाएंट्सला तीन विकेट्स राखून हरवले आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पुण्याला घरच्या मैदानावर विजयापासून वंचित ठेवले. पुण्याच्या स्टिव्हन स्मिथने (१०१) साकारलेले तडाखेबाज शतक व्यर्थ ठरले.

खेळपट्टीवर असलेले हिरवे गवत पाहून गुजरातचा कर्णधार सुरेश रैना याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. मात्र त्याचा हा निर्णय फोल ठरवत पुण्याच्या फलंदाजांनी गुजरातच्या गोलंदाजांविरुद्ध आत्मविश्वासाने खेळ केला. स्मिथने अजिंक्य रहाणे (५३) सोबत शतकी भागीदारी तर कर्णधार महेंद्रसिंग धोनी (नाबाद ३०) याच्या साथीने भागीदारी केली. त्यामुळेच पुण्याला २० षटकांत ३ बाद १९५ धावा करता आल्या. गुजरातच्या ब्रँडन मॅक्क्युलम व ड्वेन स्मिथ यांनी सलामीसाठी ८.१ षटकांत ९३ धावा केल्या. कर्णधार सुरेश रैना (३४) व दिनेश कार्तिक (५१) यांनी अर्धशतकी भागीदारी करीत संघाचा विजय दृष्टीपथात आणला. शेवटच्या षटकांत त्यांचे दोन फलंदाज बाद झाले. मात्र शुक्रवारी वाढदिवस साजरा करणाऱ्या जेम्स फॉकनरने शेवटच्या चेंडूवर विजयावर मोहोर उमटवली.

संक्षिप्त धावफलक

रायझिंग पुणे सुपरजाएंट्स : २० षटकांत ३ बाद १९५ (अजिंक्य रहाणे ५३, स्टिव्हन स्मिथ १०१, महेंद्रसिंग धोनी नाबाद ३०, ड्वेन ब्राव्हो १/४०) पराभूत वि. गुजरात लायन्स :  २० षटकांत  ७ बाद १९६ (ब्रँन्डन मॅक्क्युलम ४३, ड्वेन स्मिथ ६३, दिनेश कार्तिक ३३, सुरेश रैना ३४; अशोक िदडा २/४०), सामनावीर : ड्वेन स्मिथ