आयपीएलच्या दहा हंगामांपैकी सर्वोत्तम असा धावांचा पाठलाग करीत विजयाला गवसणी घातल्यामुळे मुंबई इंडियन्सचा आत्मविश्वास वाढला आहे. मुंबईच्या सुरुवातीच्या सामन्यांमधील यशात नितीश राणा आणि हार्दिक-कृणाल बंधू या युवकांच्या कामगिरीचा सिंहाचा वाटा होता. मात्र आता किरॉन पोलार्डसारखे जुनेजाणते खेळाडूसुद्धा जबाबदारीने आपली चुणूक दाखवू लागले आहेत. त्यामुळे पुण्याविरुद्ध पहिल्यावहिल्या विजयासह आयपीएलचे खाते उघडणाऱ्या गुजरात लायन्सविरुद्ध रविवारी होणाऱ्या लढतीत मुंबई इंडियन्सचे पारडे जड मानले जात आहे.

आयपीएल हंगामाच्या सुरुवातीला खराब कामगिरी करणाऱ्या मुंबई इंडियन्सने चार सामन्यांपैकी तीन जिंकले असून, सर्वाधिक सहा गुणांसह ते गुणतालिकेत आघाडीवर आहेत. शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुविरुद्धच्या सामन्यात मुंबईची आघाडीची फळी कोसळली होती. याकडेच त्यांना गांभीर्याने लक्ष द्यावे लागणार आहे. सॅम्युअल बद्रीच्या हॅट्ट्रिकपुढे मुंबईच्या आघाडीच्या फळीने शरणागती पत्करली होती. मात्र पोलार्डच्या पोलादी प्रहाराच्या बळावर मुंबईने विजयावर शिक्कामोर्तब केले.

याशिवाय कर्णधार रोहित शर्माचा फॉर्म ही मुंबईसाठी चिंतेची बाब ठरत आहे. इम्रान ताहीर, रशिद खान आणि बद्री या गोलंदाजांविरोधात त्याच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. त्यामुळे वानखेडे स्टेडियमच्या घरच्या मैदानावर त्याच्याकडून मोठय़ा अपेक्षा करण्यात येत आहेत.

पंडय़ा बंधूंचे अष्टपैलू योगदान हे मुंबईच्या आतापर्यंतच्या यशातील महत्त्वाचा घटक आहे. कृणालने बेंगळूरुविरुद्ध दडपणाखाली आत्मविश्वासाने खेळताना ३० चेंडूंत नाबाद ३७ धावा करीत मुंबईच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली, तर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्याने २० चेंडूंत ३७ धावा केल्या होत्या. याशिवाय त्याची डावखुरी फिरकी गोलंदाजीसुद्धा मधल्या षटकांमध्ये उपयुक्त ठरत आहे.

मुंबई कोणत्याही कठीण परिस्थितीतून मार्ग काढत विजयश्री मिळवू शकते, हे बेंगळूरुच्या सामन्याने सिद्ध केले. पॉवरप्लेच्या षटकांमध्ये हरभजन सिंग प्रभावी ठरत आहे. वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा एका सामन्याच्या विश्रांतीनंतर परतल्यास बेंगळूरुविरुद्ध महागात पडलेल्या टीम साऊदीऐवजी त्याचा संघात समावेश करण्यात येईल.

गुजरात लायन्सची प्रमुख मदार असेल ती ब्रेंडन मॅक्क्युलम आणि ड्वेन स्मिथ या सलामीवीर जोडीवर. कर्णधार सुरेश रैना आणि आरोन फिन्चसुद्धा जबाबदारीने फलंदाजी करीत आहेत. गुजरातच्या गोलंदाजीचा आता प्रमुख आधारस्तंभ असेल तो ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज अॅण्ड्रय़ू टाय. त्याने शुक्रवारी आयपीएल पदार्पणातच हॅट्ट्रिक नोंदवण्याची किमया साधली. याशिवाय रवींद्र जडेजा आणि शदाब जकाती यांची भूमिकासुद्धा निर्णायक ठरणार आहे.