तीन विजयांसह आयपीएल पदार्पणात दमदार सिंहगर्जना देणाऱ्या गुजरात लायन्सची घोडदौड सनरायझर्स हैदराबादने रोखली; परंतु स्फोटक फलंदाज ख्रिस गेलच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध विजय मिळवत पुन्हा गर्जना देण्यासाठी गुजरातचा संघ उत्सुक आहे.

सलामीवीर आरोन फिन्च आणि ब्रेंडन मॅक्क्युलम यांच्यावर गुजरातच्या फलंदाजीची प्रमुख मदार असेल. याशिवाय रैना, ड्वेन ब्राव्हो आणि दिनेश कार्तिक यांच्यासारखे धडाकेबाज फलंदाज त्यांच्याकडे आहेत. मॅक्क्युलम अद्याप आपल्या क्षमताधिष्ठित फलंदाजीला न्याय देऊ शकलेला नाही. रैनाने हैदराबादविरुद्ध ५१ चेंडूंत ७५ धावांची खेळी साकारत आपण फॉर्मात आल्याची ग्वाही दिली होती.

सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना पुरेशी साथ देत नाही. या पाश्र्वभूमीवर वेगवान गोलंदाज डेल स्टेनच्या जागी जेम्स फॉकनर किंवा ड्वेन स्मिथला संघात स्थान मिळू शकेल.

दुसरीकडे कोहली आणि ए बी डी’व्हिलियर्स हे प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर तुटून पडत असल्याचेच चित्र आहे. शेन वॉटसनचे अष्टपैलुत्व आणि युवा सर्फराझ खानची फलंदाजी बंगळुरूच्या पथ्यावर पडत आहे. मात्र गोलंदाजी ही बंगळुरूची प्रमुख चिंता आहे.

सामन्याची वेळ : दुपारी ४ पासून