बडोदा : सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेमध्ये रविवारी झालेल्या सलामीच्या सामन्यात महाराष्ट्राला पराभवाला सामोरे जावे लागले. गुजरातने महाराष्ट्राला २९ धावांनी पराभूत केले.

बडोद्याच्या मोती बाग स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरातने २० षटकांत ८ बाद १५७ धावा केल्या. कर्णधार अक्षर पटेल (३०) आणि रिपाल पटेल (२९) यांनी गुजरातसाठी बहुमूल्य योगदान दिले.

प्रत्युत्तरात महाराष्ट्राचा संघ १९.३ षटकांत १२८ धावांतच गारद झाला. डावखुरा वेगवान गोलंदाज अझान नागवासवालाने ३.३ षटकांत १९ धावांतच सहा बळी घेण्याची किमया साधली. महाराष्ट्राकडून नौशाद शेख (३१) आणि ऋतुराज गायकवाड (२६) यांनी कडवी झुंज दिली. परंतु अनुभवी केदार जाधव (७) आणि कर्णधार राहुल त्रिपाठी (५), सत्यजित बच्छाव (१) यांचे अपयश महाराष्ट्राला महागात पडले. या विजयासह गुजरातने चार गुण मिळवून गुणांचे खाते उघडले.

मुंबईची आज दिल्लीशी सलामी

मुंबई : स्थानिक क्रिकेट स्पर्धेतील बलाढय़ संघ म्हणून नावलौकिक मिळवणाऱ्या मुंबईचा सोमवारी मुश्ताक अली स्पर्धेत दिल्लीशी सामना रंगणार असून या लढतीत विजय मिळवून स्पर्धेला दमदार प्रारंभ करण्याचे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील मुंबईचे लक्ष्य असेल. फलंदाजीत सूर्यकुमारसह यशस्वी जैस्वाल, आदित्य तरे, शिवम दुबे या खेळाडूंवर मुंबईची प्रामुख्याने भिस्त आहे. तर गोलंदाजीत तुषार देशपांडे, धवल कुलकर्णी यांच्यावर मुंबईची मदार आहे.

सामन्याची वेळ : दुपारी १२ वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १