रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत गुजरातने मुंबईवर पाच गडी राखून विजय मिळवला आहे. कर्णधार पार्थिव पटेलच्या १४३ धावांच्या जोरावर गुजरातने मुंबईच्या ३१२ धावांचा यशस्वी पाठलाग केला. पाचव्या दिवसाचा खेळ सुरू होताच गुजरातने दोन फलंदाज गमावले होते. यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या पार्थिवने कर्णधाराला साजेशी खेळी करत गुजरातचा डाव सावरला. सलामीवीर समित गोहिल, मनप्रीत जुनेजा यांना साथीला घेत पार्थिवने गुजरातला पहिल्यांदा रणजी स्पर्धेचे विजेतेपद पटकावून दिले.

रणजी स्पर्धेच्या अंतिम फेरीत मुंबईने गुजरातसमोर ३१२ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना गुजरातने चौथ्या दिवशी सावध सुरुवात केली. चौथ्या दिवसअखेर गुजरातने बिनबाद ४७ धावांची मजल मारली होती. यंदाच्या मोसमात यशस्वी ठरलेला प्रियांक पांचाळ चांगली फलंदाजी करत होता. मात्र पाचव्या आणि अखेरच्या दिवसाचा खेळ सुरू होताच मुंबईचा गोलंदाज बलविंदर संधूने दोन फलंदाज बाद करत गुजरातला धक्के दिले. त्यानंतर मैदानात आलेल्या पार्थिव पटेलने सलामीवीर समित गोहिलसोबत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र गुजरातची धावसंख्या ८९ असताना समित बाद झाला आणि गुजरातला तिसरा धक्का बसला.

समित गोहिल बाद झाल्यानंतर पार्थिव पटेलने मनप्रीत जुनेजाच्या साथीने संघाला विजयाच्या दिशेने नेले. मनप्रीतसोबत शतकी भागिदारी रचत पार्थिव पटेलने गुजरातला सुस्थितीत नेले. तब्बल ४५ षटके या जोडीने मुंबईच्या गोलंदाजांना यश मिळू दिले नाही. मनप्रीत जुनेजाने अर्धशतकी खेळी करत कर्णधार पार्थिव पटेलला सुयोग्य साध दिली. गुजरातने दोनशे धावाचा टप्पा ओलांडल्यावर अखिल हेरवाडकरच्या गोलंदाजीवर मनप्रीत बाद झाला आणि मुंबईच्या अपेक्षा उंचावल्या. मात्र यानंतर राजुल भट्टसोबत ९४ धावांची भागिदारी करत पार्थिव पटेलने गुजरातला विजयाच्या जवळ नेले. गुजरातला विजयासाठी १३ धावांची आवश्यकता असताना पार्थिव पटेल बाद झाला. पार्थिवने १९६ चेंडूंमध्ये १४३ धावांची खेळी साकारली. पार्थिवने या खेळीत २४ चौकार लगावले.

पार्थिव पटेल बाद झाल्यानंतर राजुल भट्टने चिराग गांधीसोबत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. गुजरातने प्रथमच रणजी विजेतेपदावर नाव कोरत इतिहास रचला. गुजरातच्या फलंदाजांना रोखण्यात मुंबईचे गोलंदाज अपयशी ठरले. रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत मुंबईला २२८ धावांवर बाद केले. प्रत्युत्तरादाखल गुजरातने ३२८ धावा करत १०० धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. यानंतर मुंबईच्या फलंदाजांची जबाबदारीने खेळ करत दुसऱ्या डावात ४११ धावा केल्या. मात्र पहिल्या डावात ढेपाळलेली फलंदाजी आणि चौथ्या डाव्यात निष्प्रभ ठरलेली गोलंदाजी यामुळे मुंबईला पराभव पत्करावा लागला.