रणजी करंडक स्पर्धेत गुजरातच्या संघाने ऐतिहासिक कामगिरी करत तब्बल ६५ वर्षांनंतर स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. नागपूरमध्ये सुरू असलेल्या कसोटीत गुजरातने झारखंड संघावर १२३ धावांनी विजय प्राप्त केला. गुजरातकडून गोलंदाज जसप्रित बुमराह याने दुसऱया डावात सहा विकेट्स घेतल्या, तर आर.पी.सिंग याने पहिल्या डावात सहा विकेट्स घेतल्या. दुसऱया डावात गुजरातने दिलेल्या २३४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱया झारखंड संघाला गुजरातने १११ धावांत गुंडाळले.

सामन्यात प्रथम फलंदाजी करत गुजरातने सर्वबाद ३९० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात झारखंडला नाममात्र १८ धावांची आघाडी घेतला आली होती. दुसऱया डावात गुजरातचा डाव देखील २५२ धावांत संपुष्टात आला होता. झारखंडकडून शहाबाज नदीम याने पाच विकेट्स घेतल्या होत्या. मात्र, बुमराह याने आपल्या भेदक माऱयाने झारखंडच्या फंलदाजांच्या चिंधड्या उडवल्या आणि संघाला अंतिम फेरीचे दार उघडून दिले. बुमराहला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. दुसरीकडे, अंतिम फेरीसाठी तामीळनाडू आणि मुंबईच्या संघात चुरशीची लढत सुरू असून तामीळनाडूने मुंबईसमोर विजयासाठी २४६ धावांचे आव्हान ठेवले आहे. त्यामुळे अंतिम फेरीत गुजरातविरुद्ध कोणता संघ पाहायला मिळेल याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.