नोमी, जपान येथे सुरू असलेल्या आशियाई २० किमी चालण्याच्या अजिंक्यपद स्पर्धेत सोनेरी कामगिरीसह भारताच्या गुरमीत सिंगने इतिहास घडवला. या स्पर्धेत जेतेपदावर नाव कोरणारा गुरमीत पहिलावहिला भारतीय धावपटू आहे. ३० वर्षीय गुरमीतने एक तास, २० मिनिटे आणि २९ सेकंदांत ही शर्यत पूर्ण केली.
जपानच्या इसामू फजिसावाने १ तास, २० मिनिटे आणि ४९ सेकंदांत शर्यत पूर्ण करत दुसरे स्थान पटकावले. एक तास, २१ मिनिटे आणि ५२ सेकंदांत शर्यत पूर्ण करत कझाकिस्तानच्या जिर्ओजी शिइकोने तिसरे स्थान मिळवले. या जेतेपदासह गुरमीतने रिओ ऑलिम्पिकसाठी भारतीय चमूत स्थान पटकावण्यासाठी आपली दावेदारी सिद्ध केली. नऊ धावपटू आतापर्यंत रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले असून यामध्ये गुरमीतचा समावेश आहे. मात्र नऊपैकी केवळ तिघांचेच रिओवारीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.
३४ वर्षांच्या इतिहासात आशियाई अजिंक्यपद तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेत चालण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावणारा तो पहिलाच भारतीय धावपटू आहे. हकम सिंग यांनी १९७८ साली आशियाई क्रीडा स्पर्धेत २० किमी रोड रेसमध्ये, तर चंद राम यांनी १९८२ मध्ये याच प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली होती. त्यानंतर आशियाई पातळीच्या स्पर्धेत एकाही भारतीय धावपटूला सुवर्णपदक मिळवता आले नाही.
२०११ मध्ये याच स्पर्धेत गुरमीतला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. कामगिरीत सुधारणा करत २०१२ मध्ये त्याने रौप्यपदकाची कमाई केली. २०१३ आणि २०१४ मध्ये त्याला कांस्यपदक मिळाले. गेल्या वर्षी त्याला नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले. सहाव्या प्रयत्नात गुरमीतने सुवर्णपदकावर नाव कोरले. गुरमीतची वेळ राष्ट्रीय विक्रम आणि सर्वोत्तम प्रदर्शनापेक्षा काही सेकंदांनी कमी आहे