नेमबाजपटू गुरप्रीत सिंगची रिओ ऑलिम्पिकवारी पक्की झाली. म्युनिच, जर्मनी येथे सुरू असलेल्या नेमबाजी विश्वचषकात गुरप्रीतने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात चौथे स्थान मिळवले.
अंतिम फेरीत गुरप्रीतने १५४ गुणांची कमाई केली. जोआ कोस्टाने २०१.४ गुणांसह सुवर्णपदकावर नाव कोरले. टोमोयुकी मात्सुदाने २००.४ गुणांसह रौप्य तर सन यांगने १७७.३ गुणांसह कांस्यपदकाची कमाई केली. या चौघांसह पाचव्या स्थानावरील डेअम्युंग ली याचेही रिओ ऑलिम्पिकचे तिकीट पक्के झाले.
शनिवारी २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात गुरप्रीतने चौथे स्थान मिळवले, मात्र ते ऑलिम्पिकवारीसाठी पुरेसे नव्हते. ही निराशा बाजूला ठेवत गुरप्रीतने जिद्दीने खेळ करत १० मीटर एअर पिस्तूल प्रकारातून ऑलिम्पिकचा निशाणा साधला. रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला पहिला नेमबाजपटू जितू रायला यावेळी सूर गवसला नाही. जितू अंतिम फेरीसाठी पात्रच ठरू शकला नाही.
मध्य प्रदेशातील महू येथील आर्मी मार्क्समनशिप युनिटमध्ये गुरप्रीत प्रशिक्षण घेतो आहे. तो लष्करात सुभेदार पदावर कार्यरत आहे.
गेल्या वर्षी ग्रॅनडा, स्पेन येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत जितू रायने ५० मीटर फ्री पिस्तूल प्रकारात रौप्यपदकासह ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले होते. यानंतर युवा अपूर्वी चंडेलाने चांगवोन, कोरिया येथे झालेल्या नेमबाजी विश्वचषकात १० मीटर एअर रायफल प्रकारात कांस्यपदकासह रिओवारी पक्की केली होती. फोर्ट बेनिंग, अमेरिका येथे झालेल्या नेमबाजी विश्वचषकात ऑलिम्पिक पदक विजेत्या गगन नारंगने  ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात कांस्यपदकासह ऑलिम्पिकचा मार्ग सुकर केला होता. गुरप्रीतच्या आधी भारतातर्फे ऑलिम्पिकमध्ये एकमेव वैयक्तिक सुवर्णपदक विजेत्या अभिनव बिंद्राने १० मीटर एअर रायफल प्रकारात सहाव्या स्थानासह विक्रमी सहावी ऑलिम्पिकवारी पक्की केली. प्रत्येक देशातर्फे ३० नेमबाजपटू १५ विविध प्रकारांतून ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकतात.