भारतीय मल्लांकडून गेले काही दिवस देशाची प्रतिष्ठा धुळीला मिळेल अशीच कामगिरी होत आहे. गुरप्रीत सिंगला वजन जास्त भरल्याच्या कारणास्तव जागतिक ऑलिम्पिक पात्रता कुस्ती स्पर्धेतून बाद व्हावे लागले. याआधी भारताची महिला खेळाडू विनेशलादेखील याच कारणामुळे बाद व्हावे लागले होते.

गुरप्रीत हा इस्तंबुल येथे सुरू असलेल्या दुसऱ्या जागतिक ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत सहभागी झाला आहे. तो ७५ किलो वजनी गटात ग्रीको-रोमन विभागात भारताचे प्रतिनिधित्व करीत आहे. त्याचे वजन ५०० ग्रॅम्सने जास्त भरले.

मंगोलियात झालेल्या पहिल्या जागतिक पात्रता स्पर्धेत विनेशचे वजन ४०० ग्रॅम्सने जास्त भरले होते. त्यामुळे तिला स्पर्धेतून बाद व्हावे लागले होते. त्यानंतर भारतीय  कुस्ती महासंघाने तिला ताकीद दिली होती, मात्र ऑलिम्पिक स्पध्रेत पात्रतेची हमी दिल्यानंतर तिला दुसऱ्या पात्रता स्पर्धेत भाग घेण्याची संधी देण्यात आली.

इस्तंबुल येथे सुरू असलेली पात्रता स्पर्धा यंदाच्या ऑलिम्पिककरिता अखेरची स्पर्धा असल्यामुळे गुरप्रीतच्या ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेण्याच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत. त्याच्याबरोबरच या गटात अन्य खेळाडूलाही आता भाग घेणे अशक्य असल्यामुळे भारताची सुवर्णसंधी दवडली गेली आहे.

‘‘गुरप्रीत याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. भारतीय संघ इस्तंबूल स्पर्धेहून मायदेशी परतल्यानंतर महासंघाची बैठक होईल व त्यामध्ये कारवाई करण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. गुरप्रीत हा गेले महिनाभर जॉर्जियामध्ये भारतीय संघाच्या सराव शिबिरात सराव करीत आहे. तेथे दररोज वजन चाचणी घेतली जात असते. जर आपले वजन जास्त आहे असे गुरप्रीतला माहीत होते तर त्याने आम्हाला कळवणे आवश्यक होते. त्याच्याऐवजी दुसऱ्या खेळाडूला पाठवले असते,’’ असे भारतीय कुस्ती महासंघाचे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांनी सांगितले.

अन्य लढतींमध्ये ८५ किलो गटात लिथुआनियाच्या लॅमुटिस अ‍ॅडोमॅटिसने रविंदर खत्रीचा १०-६ असा पराभव केला. १३० किलो गटात बल्गेरियाच्या मेटोदेव मिलोस्लाव्ह युरिव्हने नवीनला ९-० असे हरवले. याशिवाय रविंदर सिंग (५९ किलो) आणि सुरेश यादव (६६ किलो) यांचे आव्हान पात्रता फेरीतच संपुष्टात आले.