ओंकारला रौप्य आणि आर्यनला कांस्यपदक; महाराष्ट्र अग्रस्थानावर

महाराष्ट्राची जिम्नॅस्टिकपटू अस्मी बदाडेने तिसऱ्या ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेत ‘सुवर्णचौकार’ फटकावला आहे. पहिल्या दिवशी सुवर्णपदक जिंकणाऱ्या अस्मीने दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारीही तीन सुवर्णपदकांची कमाई केली. जिम्नॅस्टिकपटू श्रेया बंगाळेनेही क्लब रँक प्रकारात सुवर्णपदक पटकावले. अ‍ॅथलेटिक्समध्ये श्रुती कांबळेने उंच उडीत सुवर्णपदक पटकावले. महाराष्ट्राला एकूण २७ पदकांसह (७ सुवर्ण, ८ रौप्य, १२ कांस्य) अग्रस्थान राखता आले आहे.

मुलांच्या (१७ वर्षांखालील) गटात महाराष्ट्राच्या ओंकार धनावडे व आर्यन नहाते यांनी समांतर बार प्रकारात अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळविले. या प्रकारात उत्तर प्रदेशच्या जतीन कनोजियाने सुवर्णपदक पटकावले.

महाराष्ट्राच्या रिंकी पावराने (१७ वर्षांखालील) मुलींच्या गटात तीन हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक मिळवले. शेवटच्या ३०० मीटरमध्ये पायातील वेदनांमुळे तिने आघाडी गमावली. याउलट तापाने आजारी असणाऱ्या पूनम सोनूनेही जिद्दीच्या जोरावर सहभाग घेत कांस्यपदकाची कमाई केली.

कबड्डी : दोन्ही संघ उपांत्य फेरीत

महाराष्ट्राच्या १७ आणि २१ वर्षांखालील मुलांच्या संघांनी कबड्डीची उपांत्य फेरी गाठली. सकाळच्या सत्रात (२१ वर्षांखालील) महाराष्ट्राने चंडीगडचे आव्हान ३९-३० परतवून लावले. विजयात सौरभ पाटील आणि पंकज मोहिते यांच्या खोलवर चढायांबरोबर त्यांनी मैदानात आखलेल्या डावपेचांचा महत्त्वाचा वाटा राहिला. इस्लाम इनामदारची अष्टपैलू साथ त्यांना मिळाली. वैभव घुगेच्या पकडीही चांगल्या झाल्या. अन्य लढतीत (१७ वर्षांखालील) महाराष्ट्राच्या मुलांनी यजमान आसामवर ४८-१७ असा विजय मिळवला. शुभम पठारे, संदेश देशमुख यांच्या चढायांना बचावात कृष्णा शिंदे आणि संकेत बिल्ले यांची पूरक साथ मिळाली. २१ वर्षांखालील गटात महाराष्ट्र गटातील विजेता ठरला. आता त्यांची गाठ उत्तर प्रदेशशी पडेल. १७ वर्षांखालील गटात महाराष्ट्र उपविजेता राहिला. त्यांची गाठ राजस्थानशी पडेल.

तिरंदाजी : ईशाची हॅट्ट्रिककडे वाटचाल

महाराष्ट्राच्या पाच तिरंदाजांनी रिकव्‍‌र्हच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. कंपाऊंड प्रकारात ईशा पवारने हॅट्ट्रिकडे पाऊल टाकत (१७ वर्षांखालील) उपांत्य फेरी गाठली. महाराष्ट्राच्या पार्थ साळुंखे (१७ वर्षांखालील), मयूर रोकडे, सचिन वेदवान, टिशा संचेती, साक्षी तोटे (चौघेही २१ वर्षांखालील) यांनी रिकव्‍‌र्हमध्ये आपली आगेकूच कायम राखली.

अ‍ॅथलेटिक्स : श्रुतीला सुवर्णपदक

महाराष्ट्राच्या श्रुती कांबळेने (१७ वर्षांखालील) उंच उडीत सुवर्णवेध घेतला. उंच उडीत श्रुतीने दुसऱ्या प्रयत्नात १.६४ मीटपर्यंत उडी मारली. अ‍ॅथलेटिक्समध्ये आणखी दोन पदके महाराष्ट्राला रिया पाटील व निधी योगेंद्रसिंग यांच्या रूपाने मिळाली. रियाने १७ वर्षांखालील गटात ४०० मीटरमध्ये कांस्यपदक मिळवले. निधीने २१ वर्षांखालील गटात कांस्यपदक मिळवले.