अनंतपूरच्या राफेल नदाल अकादमीतील मुले दिल्लीत

हैदराबादमधील अनंतपूर हे सर्वसामान्य शहर. अगदी आतापर्यंत देशातल्या अतिमागास जिल्ह्य़ांमध्ये गणना होणाऱ्या या शहरात कार्यरत एका सामाजिक संस्थेमुळे गावातील खेळात निपुण असलेली मुले टेनिसचे धडे गिरवतात, तेही राफेल नदाल टेनिस अकादमीत. ‘लाल मातीचा बादशाह’ नदालच्या आवडत्या क्ले कोर्टवरच त्यांचा सराव चालतो. टेनिस म्हणजे उच्चभ्रूंचा खेळ या समजाला छेद देत या मुलांचा रॅकेटप्रवास दमदार वाटचाल करतो आहे. अकादमीच्या नावात सामावलेल्या त्या दिग्गजाला ‘याचि देही, याचि डोळा’ भेटण्याची दुर्मीळ संधी अकादमीतील काही मुलांना मिळणार आहे. इंटरनॅशनल प्रीमिअर टेनिस लीग स्पर्धेच्या निमित्ताने राफेल नदाल तीन दिवसांच्या भारतभेटीवर आहे. स्पर्धेत इंडियन एसेस या भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणारा नदाल तिन्ही दिवस खेळणार आहे. मात्र या व्यग्र वेळापत्रकातूनच नदाल या मुलांसाठी वेळ काढणार आहे.

हैदराबादजवळच्या अनंतपूर गावात १९६९पासून ‘रुरल डेव्हलपमेंट ट्रस्ट’ ही सामाजिक संस्था कार्यरत आहे. स्पेनमधील नामवंत समाजधुरीण व्हिन्सेंट फेरर यांच्या योजनेतून साकारलेली ही संस्था आरोग्य, शालेय आहार, अल्प किमतीत घरे, महिला तसेच अपंग अशा विविध मुद्दय़ांवर काम करते. स्पेनमध्ये प्रसिद्ध असलेल्या फेरर यांच्या उपक्रमाशी संलग्न होण्याचा मानस नदालने व्यक्त केला आणि खेळाच्या माध्यमातून तंदुरुस्त जीवनशैली या विचारातून राफेल नदाल टेनिस अकादमीची स्थापना झाली. कृत्रिम प्रकाशाची व्यवस्था असणाऱ्या पाच क्ले कोर्ट्सवर अव्वल प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही मुले टेनिस शिकतात. खेळाची उपजत आवड असणाऱ्या खेळाडूंच्या निवड चाचणीतून या मुलांची निवड केली जाते. २०१०मध्ये खुद्द नदालच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या अकादमीत सध्या १७० मुले आहेत. शाळेचे वेळापत्रक सांभाळून दररोज तीन तास ही मुले टेनिसमधील बारकावे आत्मसात करतात.
‘‘मूलभूत गोष्टींसाठी संघर्ष नशिबी असलेल्या अनंतपूरमध्ये मुलांना टेनिस शिकण्यासाठी पाठवायला पालक मंडळी तयार नव्हती. मात्र थेट नदाल घडवण्याचा आमचा उद्देश नाही, ते शक्यही नाही, परंतु खेळ समजावा आणि त्याच्या माध्यमातून सकारात्मक जीवनशैली अंगी बाणावी हा प्रयत्न आहे,’’ असे ट्रस्टच्या संचालक मंडळातील सिद्धार्थ दत्ता यांनी सांगितले. ‘‘टेनिस शिकणारी ही मुले व्यावहारिक जीवनात मागे राहू नयेत, यासाठी इंग्रजी लिहिणे, बोलणे आणि संगणक प्रशिक्षण याचेही प्रशिक्षण अकादमीत देण्यात येते,’’ असे दत्ता यांनी पुढे सांगितले.
‘‘सततच्या स्पर्धामुळे नदाल अकादमीत वारंवार येऊ शकत नाही, मात्र त्याची आई संस्थेला भेट देते. प्रशिक्षण कार्यक्रम, मुलांची प्रगती यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो,’’ असे दत्ता यांनी आवर्जून स्पष्ट केले. ‘‘नदालभेटीच्या निमित्ताने राजधानी दिल्लीत दाखल झालेल्या अकादमीतल्या २५ मुलांनी बुधवारी मेट्रो सफरीचा आनंद लुटला. प्रसिद्ध इंडिया गेटलाही भेट दिली. नदाल भेटीचा हा दौरा या मुलांसाठी संस्मरणीय व्हावा हा प्रयत्न आहे,’’ असे समन्वयक झिस्को यांनी सांगितले.

राफेल नदाल २०१०मध्ये अकादमीच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित होता.