* बॅले आणि रॉबसन यांचे प्रत्येकी एक गोल * स्लोव्हाकियावर २-१ असा विजय
गॅरेथ बॅले आणि रॉबसन कानू यांनी केलेल्या प्रत्येकी एका गोलच्या जोरावर वेल्सने युरो चषक फुटबॉल स्पर्धेत स्लोव्हाकियावर २-१ असा विजय मिळवला. स्वतंत्र राष्ट्र म्हणून स्लोव्हाकियाचे हे युरो चषक पदार्पण आहे. पदार्पणाच्या लढतीत चमकादर कामगिरी करण्याचे स्लोव्हाकियाचे स्वप्न भंगले.
सामना सुरु झाल्यानंतर वेल्सने तात्काळ चेंडूवर नियंत्रण मिळवले. सहाव्या मिनिटाला गॅरेथ बॅलेने गोल करत वेल्सचे खाते उघडले. वेल्सच्या जॉनी विल्यम्सने कडून मिळालेल्या फ्री किकच्या बळावर बॅलेने शिताफीने गोल केला. स्लोव्हाकियाच्या गोलरक्षकाच्या हाताच्या अंशभर वरुन चेंडू गोलपोस्टमध्ये जाताच वेल्सच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. यानंतर स्लोव्हाकियाच्या खेळाडूंनी वेल्सच्या आक्रमणाला रोखण्याचा सातत्याने प्रयत्न केला. चेंडूचा ताबा वेल्सकडे असला तरी त्यांना गोल करण्यात अपयश आले. ३३व्या मिनिटाला पॅट्रिक रोसोव्हस्कीला पंचांनी पिवळे कार्ड दाखवले. यावेळी वेल्सच्या खेळाडूंनी पेनल्टी मिळण्याबाबत खात्री होती मात्र पंचांनी ते नाकारले. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांची गोलसाठी झटापट सुरुच राहिली.
६०व्या मिनिटाला रोसोव्हस्कीऐवजी ओंद्रेज डय़ुडा मैदानावर आला. पुढच्याच मिनिटाला वेल्सच्या खेळाडूंना भेदत डय़ुडाने स्लोव्हाकियासाठी गोल केला. बरोबरीसह स्लोव्हाकियाच्या चाहत्यांमध्ये चैतन्य पसरले. ८१व्या मिनिटाला स्लोव्हाकियाच्या वेइससला पंचांनी पिवळे कार्ड दाखवले. या प्रकारामुळे दडपणाखाली आलेल्या स्लोव्हाकियाच्या खेळाडूंना बाजूला सारत हाल रॉबसन कानूने गोल केला. रामसेने दिलेल्या पासवर रॉबसनने सुरेख गोल करत वेल्सला आघाडी मिळवून दिली. गोलनंतर लगेचच बॅलेने चेंडूवर नियंत्रण मिळवत गोलसाठी प्रयत्न केले. मात्र स्लोव्हाकियाच्या खेळाडूंनी ते यशस्वी होऊ दिले नाहीत. वेल्सने मिळवलेली आघाडी कमी करण्यासाठी स्लोव्हाकियाने जोरदार आक्रमणाचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात पिवळे कार्ड मिळालेल्या त्यांच्या खेळाडूंची संख्या वाढली. निर्धारित वेळेपर्यंत चेंडूला आपल्याकडे राखत वेल्सने बाजी मारली.
ख्रिस कोलमनच्या संघाची गुरुवारी इंग्लंडशी मुकाबला होणार आहे. २४ संघापैकी केवळ १६ संघांनाच बादफेरीची संधी मिळणार असल्याने या लढतीतील चांगला फॉर्म इंग्लंडविरुद्ध कायम राखण्यासाठी वेल्सचा संघ आतूर आहे. १९५८ विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरील बहुतांशी स्पर्धामधून वेल्सचा संघ अनुपस्थित होता. प्रदीर्घ कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय पटलावर परतलेल्या संघाला समर्थन देण्यासाठी हजारो चाहते उपस्थित होते. या ऐतिहासिक क्षणी कामगिरी उंचावण्यासाठी खेळाडू उत्सुक असल्याचे कर्णधार कोलमन यांनी सांगितले होते. चाहत्यांच्या पाठिंब्याला प्रतिसाद देत वेल्सने दिमाखदार विजय साकारला.
दुसरीकडे २०१० विश्वचषकात सहभागी झाल्यानंतर स्लोव्हाकियाचा संघ प्रथमच मोठय़ा व्यासपीठावर खेळत होता. वेल्सच्या आशा गॅरेथ बॅलेवर होत्या तर स्लोव्हाकियाची भिस्त मरेक हॅमसिकवर होती. या दोघांच्या मुकाबल्यात बॅलेने सरशी साधली. कर्णधार कोलमनने धाडसी डावपेच आखले. जॉनी विल्यम्स, आरोन रामसे आणि गॅरेथ बॅले या आक्रमणाने वेल्सने सुरुवात केली. रॉबसन कानू आणि सॅम व्होक्स या प्रसिद्ध आघाडीपटूंना विश्रांती देण्यात आली होती.
आघाडीपटूंच्या दमदार आक्रमण निर्णायक असतानाही भक्कम बचाव करणाऱ्या बेन डेव्हिसला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. युरोपियन अजिंक्यपद स्पर्धेत वेल्ससाठी खेळताना बॅलेने प्रथमच गोल केला. ओंद्रेज डय़ुडाने बदली खेळाडू म्हणून मैदानावर आल्यानंतर केवळ ५२ सेकंदात गोल केला. युरो स्पर्धेत बदली खेळाडूने केलेला हा सगळ्यात वेगवान ठरला.