अमेरिका ग्रां. प्रि. फॉर्म्युला वन शर्यत

मर्सिडिझच्या लुइस हॅमिल्टनला रविवारी रंगलेल्या अमेरिकन ग्रां. प्रि. फॉर्म्युला-वन शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले तरी त्याने सहाव्यांदा जगज्जेतेपदावर आपले नाव कोरले. यासह हॅमिल्टनने मायकेल शूमाकरच्या सात जगज्जेतेपदांच्या विक्रमाच्या दिशेने कूच केली आहे.

मर्सिडिझच्या वाल्टेरी बोट्टासने सुरुवातीपासूनच शर्यतीवर नियंत्रण मिळवत विजेतेपद पटकावले. त्याचे हे या मोसमातील चौथे तर कारकीर्दीतील सातवे जेतेपद पटकावले. ब्रिटनच्या हॅमिल्टनने पाचव्या क्रमांकापासून शर्यतीला सुरुवात केली. पण फिनलँडच्या बोट्टासचा झंझावात तो रोखू शकला नाही. हॅमिल्टनने दोन वेळा आघाडी घेतली होती. पण तीन फेऱ्या शिल्लक असताना बोट्टासने पुन्हा एकदा आघाडी घेत विजेतेपद संपादन केले. रेड बुलच्या मॅक्स वेस्र्टापेन याने तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली.

हॅमिल्टनने या शर्यतीतून १८ गुणांची कमाई करत एकूण ३८१ गुणांसह जगज्जेतेपद पटकावले. २०१९ मोसमाच्या अद्याप दोन शर्यती (ब्राझील आणि अबूधाबी ग्रां. प्रि.) शिल्लक असल्या तरी दुसऱ्या क्रमांकावरील बोट्टासला (३१४ गुण) हॅमिल्टनशी बरोबरी करता येणार नाही. फेरारीच्या चार्लस लेकलेर्क याने २४९ गुणांसह तिसरे स्थान पटकावले आहे. हॅमिल्टनने याआधी २००८, २०१४, २०१५, २०१७ आणि २०१८ मध्ये जगज्जेतेपदाची कमाई केली आहे.

‘‘माझा विश्वासच बसत नाहीये. मला पाठिंबा देणाऱ्या सर्वाचा मी आभारी आहे. माझ्यासाठी हे अभूतपूर्व यश आहे. रविवारी झालेल्या खडतर शर्यतीत वाल्टेरी बोट्टासने शानदार कामगिरी केली. विजेतेपद मिळवण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला. आता उर्वरित मोसमातही अशीच कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न असेल,’’ असे हॅमिल्टनने सांगितले.

हॅमिल्टनकडून निकी लॉडा यांचे आभार

तीन वेळा जगज्जेते ठरलेले ७० वर्षीय निकी लॉडा यांचे मे महिन्यात निधन झाले असले तरी २०१९ मोसमात त्यांनी दिलेल्या सल्ल्यामुळेच मला जगज्जेतेपद मिळवता आले, असे सांगत लुइस हॅमिल्टन याने निकी यांचे आभार मानले आहेत. ‘‘मला सर्वात जास्त उणीव निकी यांची जाणवत आहे. ते हयात असते तर माझ्या जगज्जेतेपदाने त्यांनाही आनंद झाला असता. पडद्यामागे आम्ही बरीच मेहनत घेत होतो, हा मोसम आमच्यासाठी आव्हानात्मक होता,’’ असेही हॅमिल्टन म्हणाला.

मी सहा किंवा सात वर्षांचा असतानाच वडिलांनी मला कधीही हार न मानण्याचा सल्ला दिला होता. कारकीर्दीतील सहावे जगज्जेतेपद पटकावल्यानंतर मी खूप आनंदी आहे. हे अशक्य होते, असे मला वाटत नाही. माझा संघ, सहकारी आणि माझे पालक तसेच चाहत्यांच्या साक्षीने सहाव्यांदा जगज्जेतेपद स्वीकारताना अभिमान वाटत आहे.

– लुइस हॅमिल्टन