ग्रां. प्रि. फॉर्म्युला-वन शर्यत

मर्सिडीझच्या लुइस हॅमिल्टनने रविवारी ओलसर अशा ट्रॅकवर निर्विवाद वर्चस्व गाजवत तुर्कीश ग्रां. प्रि. फॉर्म्युला-वन शर्यतीचे जेतेपद पटकावले आणि सातव्यांदा जगज्जेता होण्याचा मान मिळवला. या कामगिरीसह त्याने मायकेल शूमाकर याच्या सात जगज्जेतेपदाच्या विक्रमाशी बरोबरी साधली.

या मोसमातील १०वी शर्यत जिंकत हॅमिल्टनने कारकीर्दीत ९४ जेतेपदे पटकावण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. २०१३ मध्ये मर्सिडीझ संघातील शूमाकरची जागा घेतल्यानंतर हॅमिल्टनने सहा जगज्जेतेपदे मिळवली आहेत. मॅकलॅरेनकडून खेळताना त्याने २००८ मध्ये जगज्जेतेपद पटकावले होते. सातव्या जगज्जेतेपदासाठी हॅमिल्टनला या शर्यतीत आपला सहकारी वाल्टेरी बोट्टासपेक्षा पुढे स्थान पटकावण्याची गरज होती. मात्र हॅमिल्टनने या शर्यतीचे जेतेपद मिळवत जगज्जेतेपदावर नाव कोरले. खराब कामगिरी करणाऱ्या बोट्टासला १४व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

‘‘माझे स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या प्रत्येकाचा मी आभारी आहे. तुमच्यामुळेच हे होऊ शकले,’’ असे हॅमिल्टनने सांगितले. सहाव्या क्रमांकावरून सुरुवात करणाऱ्या हॅमिल्टनला अन्य संघांनी केलेल्या चुका आणि खराब रणनीतीमुळे पुढे जाण्याची संधी मिळाली. त्यानंतर हॅमिल्टनने मागे वळून न पाहता सलग चौथ्या शर्यतीचे जेतेपद प्राप्त केले. त्याने रेसिंग पॉइंटच्या सर्जियो पेरेझला ३० सेकंदांनी मागे टाकले. फेरारीच्या सेबॅस्टियन वेट्टेलला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.