26 February 2021

News Flash

‘तरुण संघटकांकडे खेळाची सूत्रे द्यावीत’

वेटलिफ्टिंग, पॉवरलिफ्टिंगम् व शरीरसौष्ठव यांसारख्या शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणाऱ्या खेळांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर अव्वल दर्जाचे यश मिळवण्यासाठी आपल्या देशात तरुण संघटकांकडे या खेळांची सूत्रे

| March 10, 2014 05:00 am

वेटलिफ्टिंग, पॉवरलिफ्टिंगम् व शरीरसौष्ठव यांसारख्या शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणाऱ्या खेळांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर अव्वल दर्जाचे यश मिळवण्यासाठी आपल्या देशात तरुण संघटकांकडे या खेळांची सूत्रे सोपवण्याची आवश्यकता आहे, असे मत ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय पंच व प्रशिक्षक प्रा. डॉ. अरुण दातार यांनी व्यक्त केले.
 महाराष्ट्रात शरीरसौष्ठव या खेळाची लोकप्रियता वाढविण्यात डॉ. दातार यांचा मोठा वाटा आहे. शरीरसौष्ठव, वेटलिफ्टिंग व पॉवरलिफ्टिंग या खेळात त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवले आहेत. त्यांच्या अनेक खेळाडूंनी ‘आशियाई-श्री’ व ‘जागतिक-श्री’ स्पर्धेतही विजेतेपदे मिळवली आहेत. या खेळात भारताने केलेली वाटचाल व एकूणच शारीरिक तंदुरुस्तीविषयी त्यांच्याशी केलेली बातचीत-
आपल्या देशात व्यायामशाळांची संख्या वाढत आहे. मात्र शारीरिक तंदुरुस्तीबाबत आपण कमी पडतो, असे तुम्हाला वाटते का?
व्यायामशाळा हा आपल्या देशात एक मोठा उद्योग झाला आहे. व्यायामशाळांमध्ये जाणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. असे असूनही शारीरिक तंदुरुस्तीबाबत आपण खूप मागे आहोत. खरोखरच तंदुरुस्तीचे प्रमाण वाढले असते तर दवाखाने ओस पडले असते. जिममध्ये जाणे हा एक प्रतिष्ठेचा विषय झाला आहे. तेथे योग्य रीतीने प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता आहे. जिममध्ये जाऊन वजन वाढवणे किंवा वजन घटवणे, हा व्यायाम नाही. केवळ वेगवेगळ्या मशीनवर व्यायाम केला म्हणजे व्यायाम संपला, असे मानणे चुकीचे आहे. त्याला अन्य पूरक व्यायामाची जोड द्यायला हवी.
आपल्या देशात आहाराबाबत योग्य रीतीने काळजी घेतली जाते का?
एकीकडे जिममध्ये खूप व्यायाम करायचा व दुसरीकडे पिझ्झा किंवा बर्गर यांसारखा अयोग्य आहार घ्यायचा, अशी वृत्ती दिसून येत आहे. त्याचबरोबर माहिती तंत्रज्ञान व अन्य क्षेत्रांत काम करणाऱ्या २५ ते ३५ वर्षे वयोगटातील तरुणांमध्ये मोठय़ा प्रमाणावर तंदुरुस्तीची समस्या दिसून येते. तरुण खेळाडूंमध्येही तंदुरुस्तीच्या वारंवार समस्या दिसून येत आहेत. खेळाडूंबरोबरच अन्य लोकांनीही आहाराबाबत योग्य काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
शरीरसौष्ठव या क्रीडाप्रकारात ‘एक खेळ, एक संघटना’ हे सूत्र आणण्याची आवश्यकता आहे काय?
होय. खरंतर हे सूत्र ताबडतोब अमलात आणण्याची आवश्यकता आहे. एकाच वेळी अनेक संघटना कार्यरत असल्यामुळे शरीरसौष्ठव व वेटलिफ्टिंग या खेळांमध्ये आपल्या खेळाडूंची अपेक्षेइतकी प्रगती झालेली नाही. उदयोन्मुख खेळाडूंपुढे आपण नेमका कोणत्या संघटनेच्या स्पर्धेत भाग घ्यावयाचा, असा प्रश्न निर्माण होत असतो. अनेक संघटनांचे अस्तित्व हे खेळाच्या प्रगतीस मारक आहे. एकाच जिल्ह्य़ात दोन-तीन संघटना कार्यरत असतील तर आपोआपच प्रायोजकांपुढे आपण कोणाला मदत करायची, हा प्रश्न पडतो.
 या खेळांना उत्तेजकांच्या विळख्याचा फटका बसत आहे काय?
उत्तेजक ही क्रीडा क्षेत्राला लागलेली वाळवी आहे. उत्तेजक औषध सेवनाचे दीर्घकालीन किती गंभीर परिणाम होतात, याचा खेळाडू व त्यांचे प्रशिक्षक गांभीर्याने विचार करीत नाहीत. झटपट यश मिळवण्यासाठी खेळाडू अवैध मार्गाचा उपयोग करतात आणि प्रशिक्षकही त्यांना त्यासाठी प्रवृत्त करतात, असे दिसून येत आहे. परदेशातील खेळाडू उत्तेजक औषधांचा सर्रास उपयोग करतात, मात्र वैद्यकीय चाचणीच्या वेळी आपण त्यामध्ये सापडणार नाही याची काळजी ते घेतात. दुर्दैवाने आपल्या देशात उत्तेजक प्रतिबंधक यंत्रणा अपेक्षेइतकी कार्यरत नाही. संपूर्ण देशात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या केवळ दोन-तीनच प्रयोगशाळा कार्यरत आहेत. स्पर्धापूर्वी वैद्यकीय चाचण्या घेण्याची व लगेचच निष्कर्ष मिळण्यासाठी अद्ययावत यंत्रणा आवश्यक आहे. अशा चाचण्यांचे दोन-तीन महिन्यांनी निष्कर्ष येऊन काहीही उपयोग नाही. अशा गैरमार्गाने पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना भरपूर प्रसिद्धी व पैसा मिळतो. उत्तेजकामुळे त्याचे पदक गेले तरी त्याने या पदकाद्वारे मिळविलेला पैसा वसूल होणार नाही.
वेटलिफ्टिंगची लोकप्रियता कमी होत चालली आहे काय?
होय. केवळ जिल्हाच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही या खेळाची लोकप्रियता कमी होत चालली आहे. या खेळात उत्साही संघटकांचा अभाव आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांची योग्य रीतीने दखल घेतली जात नाही. जिल्हा व राज्य स्पर्धा कधी सुरू होतात आणि कधी संपतात, हे कळतही नाही. प्रसारमाध्यमांनी हा खेळ उचलून धरला पाहिजे. लोकप्रियतेच्या अभावी मध्यंतरी कुस्तीस ऑलिम्पिकमधून हद्दपार करण्याचा प्रयत्न झाला होता. वेटलिफ्टिंगची तीच अवस्था झाली तर मला नवल वाटणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2014 5:00 am

Web Title: hand over responsibility to youths
Next Stories
1 बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर आता ट्रकचा थरार रंगणार!
2 टेनिस : सानिया-कारा उपांत्यपूर्व फेरीत
3 भारतीय क्रीडा क्षेत्रात पारदर्शकता आणणार -रामचंद्रन
Just Now!
X