राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक विजेता अपंग जलतरणपटू प्रसांता कर्माकर आता सायकलपटू होणार आहे. नवी दिल्लीत ५ मार्चपासून सुरू होणाऱ्या आशियाई सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेद्वारे कर्माकर पदार्पण करणार आहे. अपंग जलतरणपटूंसाठी वयोमर्यादा आहे. ३३ वर्षांपेक्षा अधिक वयोमान असणाऱ्या जलतरणपटूंना सहभागी होता येत नाही. मात्र सायकलिंगसाठी कोणतीही वयोमर्यादा नसल्याने कर्माकरला सुलभतेने या नव्या खेळात आपल्या कर्तृत्वाची चुणूक दाखवता येणार आहे.  सात वर्षांचा असताना एका अपघातामुळे कर्माकरने उजवा हात गमावला. मात्र या घटनेने खचून न जाता कर्माकरने क्रीडापटू म्हणून शानदार कारकीर्द घडवली.