पहिल्या डावात विदर्भाने 95 धावांची आघाडी घेतल्यानंतर, शेष भारताने दुसऱ्या डावात दमदार पुनरागमन केलं आहे. हनुमा विहारी आणि कर्णधार अजिंक्य रहाणेच्या शतकी भागीदारीच्या जोरावर शेष भारताने दुसऱ्या डावात शतकी आघाडी घेतली आहे. हनुमा विहारीने सलग दुसऱ्या डावात शतकी खेळी करत, आपल्यातला फॉर्म अजुनही कायम असल्याचं दाखवून दिलं. पहिल्या डावात हनुमा विहारीने 114 धावा काढल्या होत्या. त्याच्या याच खेळीच्या जोरावर शेष भारताने पहिल्या डावात 330 धावांपर्यंत मजल मारली होती.

दुसऱ्या डावात केलेल्या शतकी खेळीसह हनुमा विहारीने एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे. इराणी चषकात सलग तीन डावांमध्ये शतक झळकावणारा हनुमा विहारी पहिला फलंदाज ठरला आहे. 70 च्या दशकात दिलीप वेंगसरकर यांना हा विक्रम आपल्या नावे करण्याची संधी होती, मात्र दुसऱ्या डावात वेंगसरकर 90 धावांवर बाद झाले होते.