बॉर्डर-गावसकर मालिका जिंकून मायदेशी परतलेल्या भारतीय संघातील सदस्य असणाऱ्या हनुमा विहारीने तिसऱ्या कसोटीनंतर भारताचा माजी क्रिकेटपटू आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या अध्यक्षपदी असणाऱ्या राहुल द्रविडसंदर्भात एक खुलासा केलाय.  बॉर्डर-गावसकर मालिकेतील सिडनीमधील तिसऱ्या कसोटी सामन्यात दुखापतीनंतर एखाद्या योद्ध्याप्रमाणे खिंड लढवणाऱ्या हनुमा विहारीला सामना संपल्यानंतर द्रविडने एक खास मेसेज केला होता. तिसऱ्या कसोटीमधील पराभव टाळण्यासाठी मैदानावर तग धरत हनुमा विहारी आणि आर. अश्विन यांनी तब्बल २५९ चेंडू खेळून काढले आणि मालिका तिसऱ्या कसोटीनंतर १-१ अशी बरोबरीत राहिली. मालिका विजयामध्ये नंतर हा अनिर्णित राहिलेला सामनाही फार महत्वाचा ठरला.

नक्की पाहा >> क्रिकेटची हत्या केली म्हणणाऱ्या भाजपा नेत्याला हनुमा विहारीचा भन्नाट रिप्लाय; सेहवागही झाला लोटपोट

तिसऱ्या कसोटीमध्ये भारताला पराभव टाळण्यासाठी पाचवा दिवस खेळून काढायचा होता. चेतेश्वर पुजाराची सोबत करण्यासाठी हनुमा विहारी मैदानात आला तेव्हा भारताला मालिकेमधील आवाहन टिकवून ठेवण्यासाठी ५० हून अधिक षटकं खेळून काढायची होती. रविंद्र जाडेजाला दुखापत झाल्याने पुजारा आणि हनुमा विहारी ही भारताची शेवटची फलंदाजांची जोडी होती. त्यामुळेच त्यांनी सावध खेळी केली. मात्र ५० धावा पूर्ण झाल्यानंतर ८९ षटकात पुजारा बाद झाला आणि भारताला आणखीन एक झटका बसला. ४० षटकं बाकी असताना अश्वीन फलंदाजीसाठी आला. मात्र दोघांनीही या ४० ओव्हर खेळून काढत यजमानांना अशक्य वाटणारा विजय मिळू दिला नाही. हनुमा विहारीने तर हॅमस्ट्रींगचा त्रास होत असतानाही मैदानात उभं राहण्याचा निर्णय़ घेतला. १६१ चेंडूंमध्ये त्याने नाबाद २३ धावा करत भारतीय संघाचं मालिकेती आव्हान कायम ठेवण्याला प्राधान्य दिलं. याचाच परिणाम म्हणजे भारताने सिडनीच्या मैदानातील ही कसोटी अनिर्णित राखण्यात यश मिळवलं.

नुकत्याच हनुमा विहारीने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये या कसोटीनंतर राहुल द्रविडने आपल्याला खास मेसेज केल्याची माहिती दिली. राहुलने हनुमाचं कौतुक करणारा मेसेज केला होता. या मुलाखतीमध्ये हनुमा विहारीने राहुल द्रविडचे सध्याच्या संघातील खेळाडू घडवण्यामधील योगदानाबद्दलही सांगितलं. द्रविडने अनेक खेळाडूंना रणजी चषक आणि भारतीय संघातील स्थान यामधील अंतर कमी करण्यासाठी मदत केल्याचं हनुमाने म्हटलं आहे. द्रविडने भारतीय अ संघाच्या प्रशिक्षक पदाची भूमिका बजावताना हे काम केल्याचंही हनुमा म्हणाला आहे.

“सिडनी कसोटीनंतर द्रविड सरांनी मला टेक्सट मेसेज केला होता. त्यांनी मला खूप छान खेळलास, तू खूप छान काम केलं आहेस, असा मेसेज पाठवला होता. ते असेच आहेत म्हणून मला त्यांचा खूप आदर वाटतो,” असं हनुमाने मुलाखतीमध्ये सांगितलं.

नक्की वाचा >>  Ind vs Aus: …म्हणून भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर क्रिकेट चाहते मानतायत द्रविडचे आभार

“आज संघात खेळणारे सिराज, शुभमन, मयांक आणि अनेक खेळाडू हे भारत अ संघासाठी खेळले आहेत. मागील तीन ते चार वर्षात आम्ही भारत अ संघाकडून खेळताना अनेक दौरे केले. त्यावेळी राहुल द्रविडच प्रशिक्षक होते. यापूर्वी भारत अ संघाने एवढे दौरे केल्याचं मला वाटत नाही. त्यामुळेच रणजी चषक आणि भारतीय संघातील अंतर कमी होण्यास मदत झाली. आम्ही खूप वेगाने प्रगती करत संघात जागा मिळवली. यामुळेच आज आम्हाला कसोटीत खेळण्याची संधी मिळाली आणि आम्ही इतर कोणत्याही खेळाडूपेक्षा कमी नाही. त्यांच्यामुळेच (द्रविडमुळेच) हे शक्य झालं आहे,” असं हनुमाने मुलाखतीमध्ये सांगितलं.

ज्या पद्धतीने द्रविडने तरुण भारतीय खेळाडूंना प्रशिक्षण दिलं आहे त्यासाठी त्यांना योग्य ते क्रेडिट दिलं पाहिजे असंही हनुमा सांगतो. २७ वर्षीय हनुमाने द्रविड कायमच तरुण खेळाडूंची मदत करण्यासाठी तयार असतो असं सांगितलं. सध्या द्रविड बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा अध्यक्ष आहे. “एक तरुण खेळाडू म्हणून आम्ही त्यांना आमच्या खेळासाठी खूप क्रेडीट दिलं पाहिजे. त्यांनी आम्हाला आमचा नैसर्गिक खेळ खेळू दिला. जेव्हा आम्ही त्यांच्या प्रशिक्षणाखाली खेळतो तेव्हा ते प्रशिक्षकापेक्षा सल्लागार अधिक वाटले. आम्हाला कधीच दडपण आळं नाही. आम्हाला जी काही मदत लागली ती पुरवण्यासाठी ते कायमच हजर असायचे. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यादरम्यानही मी त्यांना फोन केला होता. तेव्हा मी त्यांना सर मी कसोटी पदार्पण करत आहे असं सांगितलं. त्यावर त्यांनी, तू रणजी आणि भारत अ संघासाठी खेळताना खूप छान कामगिरी केलीय. तू पदार्पणासाठी तयार आहेस, असं सांगितलं होतं. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला,” असंही हनुमाने सांगितलं.