इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याने लिहिलेल्या पुस्तकात २०१९ च्या वन डे विश्वचषक स्पर्धेतील इंग्लंड-भारत साखळी सामन्याबाबत उल्लेख केला. या सामन्यातील रोहित शर्मा, विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी या तिघांच्या फलंदाजीबद्दल त्याने संशय व्यक्त केला. २०१९ च्या विश्वचषकात भारत-इंग्लंड सामन्यानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर टीकेची झोड उठली होती. संथ खेळीमुळे चाहतेही धोनीवर नाराज असल्याचे दिसू आले होते. अनेकांनी धोनीच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ‘निवृत्ती घे’ असा सल्ला दिला होता. पण, धोनी जखमी असतानाही संघासाठी मैदानात उतरल्याचे काही दिवसांनंतर स्पष्ट झाले आणि धोनीबद्दल चाहत्यांच्या मनात असलेला आदर अजून वाढला.

सामन्यात इंग्लंडने ७ गडी गमावत ३३७ धावा केल्या होत्या, पण भारतीय संघाला मात्र हे आव्हान पेलवलं नव्हतं. भारताला त्या सामन्यात ३१ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यानंतर, उपांत्य फेरीत पाकिस्तानशी सामना होऊ नये व पुढील सामन्यात पाकिस्तानचे रन रेटचे गणित बिघडावे यासाठी भारत इंग्लंडविरुद्धचा सामना हरला, अशी चर्चा सोशल मीडियावर क्रिकेटप्रेमींमध्ये रंगली होती. धोनीच्य खेळीवर स्टोक्सनेही प्रश्न उपस्थित केले होते. पण त्या सामन्यानंतर एक फोटो व्हायरल झाला होता.

इंग्लंडविरूद्ध पराभूत होणं हा भारताचा स्पर्धेतील पहिला पराभव होता. त्यावेळी एक गोष्ट सर्वांकडून दुर्लक्षित झाली. ती म्हणजे फलंदाजी करताना धोनी प्रचंड वेदना सहन करत होता. सामना संपला तेव्हा धोनीच्या अंगठ्यातून रक्त वाहत होतं. धोनी अंगठा चोखून रक्त थुंकत असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. धोनीच्या अंगठ्याला गंभीर जखम झाली होती. सुरुवातीला यष्टीरक्षण करताना आणि नंतर फलंदाजी करताना त्याला प्रचंड त्रास होत होता.

दरम्यान, धोनीने सामन्यात ३१ चेंडूत ४२ धावा केल्या होत्या. त्यात ४ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता. तसेच शेवटच्या पाच षटकात भारताला केवळ २० एकेरी धावा, ३ चौकार आणि १ षटकार अशा धावा जमवता आल्या. तर ७ चेंडू हे निर्धाव राहिले. त्यामुळे भारताला ३१ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.