भारतीय संघ गेले चार महिने करोनाच्या धसक्याने घरात आहे. मार्च महिन्यापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट बंद आहे. उद्यापासून इंग्लंड-वेस्टइंडिज क्रिकेट मालिकेला सुरुवात होणार आहे. पण भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी मात्र सुमारे १० महिन्यांपासून क्रिकेट पासून दूर आहे. आज धोनीचा वाढदिवस असल्याने धोनी चर्चेत आहे. धोनीने आज ४०व्या वर्षात पदार्पण केलं आहे. त्यामुळे धोनीवर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.

आजी माजी क्रिकेटपटू, क्रिकेट जाणकार, क्रीडापटू आणि IPL मधील संघ साऱ्यांकडून धोनीला शुभेच्छा मिळताना दिसत आहेत. त्यात मुंबई पोलिसांनी धोनीला दिलेल्या शुभेच्छा विशेष भाव खाऊन गेल्या. त्यांनी ट्विटर वर एक फोटो पोस्ट केला. त्या फोटोवर MSD लिहिलं. खरं पाहता MSD म्हणजे महेंद्रसिंग धोनी असं होतं. पण करोनाकाळात पोलिसांनी यातून एक नवा फुल फॉर्म शोधून काढला. पोलिसांनी MSD शब्दाचा फुल फॉर्म maintain social distance (सामाजिक अंतराचे भान ठेवा) असा लिहिला. तसेच फोटोत देखील स्टंपवरील बेल्स अशा प्रकारे ठेवल्या की त्याला घराचा आकार येईल आणि साऱ्यांना घरात सुखरूप राहण्याचा संदेशही दिला.

मुंबईसह देशभरात करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नाही. करोनाबधितांच्या यादीत भारत सध्या तिसऱ्या स्थानावर आहे ही साऱ्यांसाठीच चिंतेची बाब आहे. पण करोनाचा प्रसार आणि प्रादुर्भाव याचा वेग कमी करण्यात भारत हळूहळू यशस्वी होताना दिसत आहे. राष्ट्रीय स्तरावर लॉकडाउन उठवण्यात आला असला तरी राज्य स्तरावर आणि स्थानिक पातळीवर गरज पाहून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत.