भारताचा अनुभवी यष्टीरक्षक आणि कोलकाता नाइट रायडर्स संघाचा कर्णधार दिनेश कार्तिक याने भारतासाठी अनेक सामन्यात धमाकेदार कामगिरी केली. पण त्याची लक्षात राहिलेली खेळी म्हणजे निदाहास ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातील फटकेबाजी… बांगलादेश विरूद्धच्या अंतिम सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर ५ धावा हव्या असताना त्याने लगावलेला षटकार अजूनही क्रिकेटप्रेमींच्या लक्षात आहे. निदाहास ट्रॉफीचा नायक ठरलेला दिनेश कार्तिक याने आज ३६ व्या वर्षात पदार्पण केले. त्या निमित्त क्रिकेट विश्वातील अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या. रोहित शर्माने तर त्या षटकारासाठी त्याचे विशेष आभारही मानले.

 

View this post on Instagram

 

Happy birthday Dk baba. Thanks for that last ball six @dk00019

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45) on

यष्टिरक्षक म्हणून पार्थिव पटेल अयशस्वी ठरल्यानंतर दिनेश कार्तिकला टीम इंडियामध्ये संधी मिळाली. ५ सप्टेंबर २००४ ला लॉर्ड्सच्या मैदानावर त्याने भारताकडून आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. टीम इंडियामधून त्याला कायम आत-बाहेर करण्यात आले, पण आयपीएल मध्ये दिल्ली, पंजाब, बंगळुरू, मुंबई, गुजरात आणि कोलकाता या संघांतून खेळत त्याने चांगली कामगिरी केली आहे. सध्या तो कोलकाता संघाचा कर्णधार आहे, मात्र धोनीच्या अनुपस्थितीतदेखील टीम इंडियामध्ये यष्टीरक्षक म्हणून त्याला पहिली पसंती नाही.