सचिन तेंडुलकरनंतर संपूर्ण जगभरात प्रेक्षकांची पसंती लाभलेला भारतीय संघाचा खेळाडू म्हणजे महेंद्रसिंह धोनी. आपल्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीत आतापर्यंत भारताला अनेक महत्वाच्या स्पर्धा जिंकून देणाऱ्या धोनीने आज वयाच्या ३८ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. प्रसंग कितीही खडतर असो धोनीने आतापर्यंत कोणत्याही प्रकारे आक्रस्ताळेपणा न करता शांत डोक्याने भारताला विजयाचा मार्ग दाखवला आहे. त्याच्या याच गुणासाठी त्याला ‘कॅप्टन कूल’ अशी पदवीही मिळाली. रेल्वेमध्ये तिकीट तपासनीस ते भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार असा धोनीचा प्रवास आपण सर्वांनीच अनुभवला आहे. मात्र धोनीच्या वाढदिवसाच्या निमीत्ताने त्याच्या आयुष्याशी निगडीत ८ महत्वाच्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

१) धोनीला कुत्र्यांविषयी विशेष प्रेम –

कुत्र्यांबद्दल धोनीच्या मनात विशेष प्रेम आहे. २०१३ सालात धोनीने रांचीमधील Hope या संस्थेमधून भटका कुत्रा विकत घेतला होता, याचा फोटो धोनीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअरही केला होता. आपल्या या कुत्र्याला धोनीने लिया असं खास नावंही दिलं आहे. आतापर्यंत अनेकदा आपण धोनीला मैदानात सुरक्षा कर्मचाऱ्यांसोबत असणाऱ्या कुत्र्याशी खेळताना पाहिलं आहे.

 

२) मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये ३ महत्वाची विजेतेपदं मिळणारा धोनी पहिला कर्णधार –

आतापर्यंतच्या कारकिर्दीत धोनीच्या खात्यात अनेक विक्रमांची नोंद झालेली आहे. मर्यादीत षटकांच्या सामन्यातील ३ महत्वाच्या स्पर्धांचं विजेतेपद मिळवणारा धोनी पहिला कर्णधार ठरला आहे. धोनीने आतापर्यंत आपल्या कर्णधारपदाच्या काळात भारताला २००७ साली टी-२० विश्वचषक, २०११ साली क्रिकेट विश्वचषक आणि २०१३ साली चॅम्पियन्स ट्रॉफी मिळवून दिली आहे.

 

३) भारतीय लष्कराकडून धोनीला मानाचा लेफ्टनंट कर्नल हा बहुमान –

धोनीने अनेक कार्यक्रमांमध्ये आपल्याला लष्करात भरती होण्याची इच्छा होती असं सांगितलं होतं. यावरुन भारतीय लष्कराने १ नोव्हेंबर २०११ साली धोनीला लेफ्टनंट कर्नल ही मानाची पदवी दिली होती. धोनीच्या आधी भारतीय क्रिकेट संघातून केवळ कपिल देव या खेळाडूंनाच ही संधी मिळाली आहे. २०१८ सालात पार पडलेल्या पद्म पुरस्कार वितरण सोहळ्यात धोनीने लष्कराचाच गणवेश घालून पद्मभुषण पुरस्कार स्विकारला होता.

 

४) धोनी आणि अभिनेत्री बिपाशा बासू चांगले मित्र –

धोनीच्या अनेक चाहत्यांना ही गोष्ट कदाचीत माहिती नसेल, मात्र धोनी आणि बिपाशा बासू हे दोघेही चांगले मित्र आहेत. बिपाशा बासू आणि जॉन अब्राहम यांच्यातील प्रेमप्रकरण सुरु असल्यापासून दोघांची चांगली मैत्री आहे. ज्यावेळी धोनी आणि त्याची पत्नी साक्षी यांच्यात प्रेम असल्याची चर्चा सुरु होती, या गोष्टीची संपूर्ण कल्पना बिपाशाला होती.

 

५) चिकन बटर मसाला, धोनीचा सर्वात आवडता पदार्थ –

सध्या यो-यो टेस्टच्या जमान्यात सर्व क्रिकेटपटू आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींकडे कटाक्षाने लक्ष देत असतात. भारताचा सध्याचा कर्णधार विराट कोहली हा फिटनेसच्या बाबतीत प्रचंड सजग आहे. मात्र जेवण्याचा विषय आला की धोनी आपलं डाएट काहीवेळासाठी विसरुन जातो. एका मुलाखतीत धोनीने, चिकन बटर मसाला, कबाब, चिकन टिक्का पिझ्झा हे पदार्थ आपले सर्वात आवडीचे असल्याचं सांगितलं होतं. याचसोबत गोड पदार्थांत धोनीला गाजराचा हलवा, खीर आणि दूध या गोष्टी आवडतात.

 

६) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या यष्टीरक्षकांच्या यादीत धोनी तिसऱ्या क्रमांकावर –

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटी, वन-डे आणि टी-२० मिळून सर्वाधिक बळी घेणाऱ्या यष्टीरक्षकांच्या यादीत धोनी सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा माजी यष्टीरक्षक मार्क बाऊचर (९९८) बळींसह पहिल्या, ऑस्ट्रेलियाचा अॅडम गिलख्रिस्ट (९०५) बळींसह दुसऱ्या स्थानावर आहे. माहीच्या खात्यात ७७८ बळी जमा आहेत.

 

७) शाहरुखनंतर धोनकडे सर्वाधीक उत्पादनांच्या जाहीराती –

जाहीरातींच्या यादीत धोनीच्या नावावर सध्या २० उत्पादनांची नोंद आहे. ओरिएंट फॅन, पेप्सी, रिबॉक यासारख्या एकापेक्षा एक सरस उत्पादनांच्या जाहीराती धोनी करतो.

 

८) धोनीच्या नावावर अंदाजे १ कोटी ११ लाखांची संपत्ती –

सध्या धोनीकडे अंदाजे १ कोटी ११ लाखांची संपत्ती आहे. जाहीरातींव्यतिरीक्त धोनीने काही गुंतवणूकही केल्या आहेत. ISL या फुटबॉल लिगमध्ये चेन्नई एफसी संघाची मालकी, हॉकी इंडिया लीगमध्ये रांची रेजची मालकी आणि रेसींग टीम सध्या धोनीच्या नावावर आहे. जाहीराती वगळता या सर्व ठिकाणांमधून धोनीला पैसा मिळत असतो.